मुंबई : ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांने सारं जग हळहळलं. चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या या स्फोटांमध्ये जवळपास ३०० निष्पाप नागरिकांचा बळी गेला. या हल्ल्याचा साऱ्या जगातून निषेध करण्यात आला. अनेकांनी मृतांच्या कुटुंबीयांना सहानुभूती देत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची तीव्र शब्दांत निंदा केली. कोणी सोशल मीडिया पोस्ट लिहित, तर कोणी एकादं प्रतिकात्मक चित्र रेखाटत या प्रसंगी व्यक्त होण्याला प्राधान्य दिलं. यामध्ये दुग्धजन्य पदार्थांच्या उत्पादनांसाठी नावाजलेल्या 'अमूल' उद्योग समुहाचाही सहभाग पाहायला मिळाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध प्रसंग आणि विषयांना अनुसरून 'अमूल'कडून नेहमीच काही प्रतिकात्मक चित्र साकारण्यात येतात. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ज्यामध्ये 'अमूल'ची बाहुली चक्क रडत आणि हळहळत असल्याचं दाखवण्यात आलं. श्रीलंका बॉम्ब हल्ल्यांमधील मृतांना या कार्टूनच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. यामध्ये दु:खात अश्रू वाहणारे दोन डोळे देसत असून, अश्रूच्या थेंबाचा आकार हा श्रीलंका या देशाच्या आकाराप्रमाणे साकारण्यात आला आहे. 



“Heartless. Defenceless. Senseless” अशी टॅगलाईन या पोस्टवर देण्यात आलीआहे. ज्या माध्यमातून या क्रूर हल्ल्याचा विरोध करत अमूलने धार्मिक स्थळ आणि निष्पापांवर झालेल्या हल्ल्यावर चिंता आणि नाराजीचा सूर आळवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच ही कलात्मक आणि तितकीच परिणामकारक पोस्ट शेअर करत श्रीलंकेच्या जनतेसोबत आपण उभं असल्याची भावना व्यक्त केली. या साऱ्यामध्ये पुन्हा एकदा माणुसकीच्या नि:स्वार्थ भावनेचं दर्शन झालं हेही तितकच खरं.