मुंबई : आपण विवाहीत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मान्य केलं होतं. परंतु, मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल या मात्र अजुनही नरेंद्र मोदींना 'अविवाहीत' समजतात. एका सरकारी कार्यक्रमादरम्यान बोलताना आनंदीबेन यांनी पंतप्रधान मोदी अविवाहीत असल्याचं म्हटलं. हरदा जिल्ह्यातील तिमारी गावच्या आंगनवाडी केंद्रावरच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या कार्यक्रमात आनंदीबेन महिलांसमोर नरेंद्र मोदी अविवाहीत असल्याचं सांगतान दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी 'त्यांनी' लग्न केलं नाही, हे संपूर्ण जगाला माहीत आहे... पंतप्रधान मोदींनी विवाह केलेला नाही, हे तर तुम्हाला माहीत आहे ना... नरेंद्र भाईंनी विवाह केलेला नाही. परंतु, महिला आणि मुलांना काय अडचणी येतात, हे मोदींना अविवाहीत असतानाही समजतं' असं आनंदीबेन यांनी म्हटलंय.


आनंदीबेन यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आनंदीबेन यांचं हे वक्तव्य धादांत खोटं असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. बनारसमध्ये नामांकन अर्ज दाखल करताना मोदींनीच, जसोदाबेन यांच्याशी आपला विवाह झाल्याचं मान्य केलं होतं. 


मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर आनंदीबेन अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे वादात सापडल्या आहेत. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आरुढ झाल्यानंतर अनपेक्षितरित्या आनंदबेन यांच्या गळ्यात गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली होती.