`उगाच पोलिसांना दोष देऊ नका,` अल्लू अर्जूनच्या अटकेवर उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले, `जर तुम्हाला तिथे...`
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. पवन कल्याण हे चिरंजीवी (Chiranjeevi) यांचे भाऊ आहेत. चिरंजीवी स्क्रिनिंगला जाताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मास्क घालतात असं त्यांनी सांगितलं आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) अटकेसाठी पोलिसांना दोष देण्यास नकार दिला आहे. कायदा सर्वांना समान असून, पोलिसांनी लोकांच्या सुरक्षा लक्षात घेऊन कारवाई केली पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. एनडीएचा मित्रपक्ष जनसेना पक्षाचे अध्यक्ष असणाऱ्या पवन कल्याण यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांचं कौतुक केलं असून महान नेते म्हटलं आहे. तसंच अल्लू अर्जूनच्या वतीने कोणीतरी चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या घरी जायला हवं होतं असं सुचवलं आहे.
प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक गप्पा मारताना पवन कल्याण यांनी 4 डिसेंबरला संध्या चित्रपटागृहाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीवर आपलं मत मांडलं. अल्लू अर्जून पुष्पा 2 चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी चित्रपटगृहात गेला होता. यामुळे तिथे चाहत्यांनी एकच धावपळ केली होती. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. यानंतर हैदराबाद पोलिसांनी अल्लून अर्जूनविरोधात गुन्हा दाखल केला होता. अल्लू अर्जूनला पोलिसांनी अटकही केली होती. पण त्यानंतर लगेच हायकोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता.
पवन कल्याण यांनी कायदा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे असं सांगितलं. "कायदा सर्वांसाठी समान आहे, आणि अशा घटनांमध्ये मी पोलिसांना दोष देत नाही, ते सार्वजनिक सुरक्षेचा विचार करून काम करतात. थिएटरच्या कर्मचाऱ्यांनी अल्लू अर्जुनला कोणत्याही समस्येबद्दल आधीच कळवायला हवं होतं. एकदा तो सीटवर बसला, त्यांनी त्याला आवश्यक असल्यास ती खाली करण्याची सूचना द्यायला हवी होती," असं पवन कल्याण म्हणाले आहेत.
पवन कल्याण आणि अल्लू अर्जून हे नात्यात आहेत. अल्लू अर्जुनची मावशी सुरेखा हिचा विवाह अभिनेता चिरंजीवी म्हणजेच पवन कल्याण यांच्या मोठ्या भावाशी झाला आहे.
“अल्लू अर्जुनच्या वतीने कोणीतरी पीडितेच्या कुटुंबाला आधी भेट दिली असती तर बरं झालं असतं. या घटनेत रेवती या महिलेचा मृत्यू झाल्याने मला खूप मोठा धक्का बसला आहे. कुटुंबाला आधार देण्यासाठी आपण सर्वजण येथे आहोत हे आपण आधी सांगायला हवं होतं. चूक त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाशिवाय झाली नसली तरी त्याबद्दल पश्चातापाची भावना असायला हवी होती. या प्रकरणात माणुसकीचा अभाव स्पष्ट दिसतो. सर्वांनी रेवतीच्या घरी जाऊन धीर आणि शोक व्यक्त करायला हवा होता. ते न केल्यामुळेच लोकांचा रोष आहे. या घटनेमुळे कोणीतरी आपला जीव गमावला हे कळल्यावर अर्जुनलाही वेदना होत आहेत,” असं पवन कल्याण म्हणाले.
सिनेमा हा एक एकत्रित प्रयत्न आहे. या घटनेसाठी एकट्या अल्लू अर्जुनला जबाबदार ठरवणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी चेंगराचेंगरीनंतरच्या घडामोडींना योग्य प्रतिसाद दिला. काही वेळा परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात. पूर्वी चिरंजीवीही आपल्या चाहत्यांसोबत चित्रपट पाहत असत. ते मास्क घालून एकटेच थिएटरमध्ये गेले असते असंही ते म्हणाले.
"तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे एक महान नेते आहेत. त्यांनी अत्यंत खालच्या स्तरावरुन सुरुवात केली आहे. त्यांनी वायएसआरसीपीसारखे काम केलं नाही. त्यांनी राज्याला फायदे मिळवून देण्यावर लक्ष केंद्रित केलं. तिकिटांच्या किमती वाढवण्यासाठी लवचिकता दिली गेली, ज्यामुळे चित्रपट संग्रह वाढला. सालार सारख्या चित्रपट आणि त्यांच्या सहकार्याने पुष्पा 2 ने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले," असं कौतुकही त्यांनी केलं.