हैदराबाद - उत्तर प्रदेशपाठोपाठ आता काँग्रेसने आणखी एक साथीदार गमावला आहे. लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाशी आघाडी होणार नसल्याची घोषणा काँग्रेसचे आंध्र प्रदेशमधील प्रभारी ओमेन चांडी यांनी केली. काँग्रेस आंध्र प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा चांडी यांनी केली. केवळ लोकसभाच नव्हे तर विधानसभेसाठीही तेलुगू देसमशी निवडणूकपूर्व आघाडी होणार नाही, असेही काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या ३१ जानेवारीला आंध्र प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून, निवडणुकीची पुढची रणनिती आखण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. येत्या १३ फेब्रुवारीपासून राज्यातील १३ जिल्ह्यात यात्रा करण्याचाही निर्णय यावेळी प्रदेशाध्यक्ष रघुवीरा रेड्डी यांनी जाहीर केला. काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्षाने नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत निवडणूकपूर्व आघाडी केली होती. पण तेलंगणा राष्ट्र समितीच्या के चंद्रशेखर राव यांच्या करिष्म्यापुढे आघाडीचे काहीही चालले नाही. दोन्ही पक्षांच्या निवडणूक पूर्व आघाडीमुळे दोघांचेही नुकसान झाल्याचे पुढे आले. २०१४ मध्ये तेलुगू देसमकडे तेलंगणामध्ये १५ आमदार होते आता ही संख्या २ वर येऊन ठेपलीय. तर काँग्रेसच्या आमदारांची संख्याही २१ वरून १९ वर आली आहे.


लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची हाक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. पण उत्तर प्रदेशात गेल्या आठवड्यातच समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आपली स्वतंत्र आघाडी करण्याची घोषणा केली. उत्तर प्रदेशातील ८० जागांची वाटणी या दोन्ही पक्षांनी करून घेतली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशात काँग्रेसला स्वतंत्रपणे लढावे लागणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून काल प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात आणण्यात आले. त्यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याकडे पू्र्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सप, बसप आणि आता तेलुगू देसम पक्षाची काँग्रेसशी निवडणूकपूर्व आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.