मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांची अवस्था आणखीनच बिकट झाल्याचे समोर आले आहे. अनिल अंबानी यांना आता त्यांच्याविरुद्धचे कायदेशीर खटले लढणेही अवघड होऊन बसले आहे. हे खटले लढवण्यासाठी अनिल अंबानी यांना आपल्या घरातील सर्व दागिने विकून टाकावे लागले. तसेच सध्या खर्चासाठीही त्यांच्यावर मुलाकडून कर्ज घेण्याची वेळ आली आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल अंबानी यांनी शुक्रवारी लंडन येथील न्यायालयाला ही माहिती दिली. चिनी बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकवल्याप्रकरणी सध्या लंडन येथील न्यायालयात खटला सुरु आहे. या बँकांनी अनिल अंबानी यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला आहे. अनिल अंबानी यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या असल्याचे या बँकाचे म्हणणे आहे. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अनिल अंबानी यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी अनिल अंबानी यांनी आपण सध्याच्या घडीला अत्यंत साधे जीवन जगत असल्याचे सांगितले. मी धूम्रपान आणि मद्यसेवनही सोडले आहे. मी अलिशान जीवन जगत असल्याच्या गोष्टी ही प्रसारमाध्यमांची निर्मिती आहे.


नामुष्की... कर्ज न फेडल्यामुळे ADAG समूहाचे मुंबईतील मुख्यालय येस बँकेच्या ताब्यात


वकिलांची फी आणि इतर कायदेशीर खर्चासाठी जानेवारी ते जून या कालावधीत घरातील सर्व दागिने विकावे लागले. दागिन्यांच्या विक्रीतून आपल्याला ९.९ कोटी रुपये मिळाले होते. यानंतर आता माझ्याकडे देण्यासारखे फारसे काही उरलेले नाही. तसेच माझ्याकडे अलिशान गाड्यांचा ताफा असल्याची प्रसारमाध्यमांतील वृत्ते ही अतिरंजित आहेत. माझ्याकडे कधीच रोल्स रॉईस कार नव्हती. सध्या माझ्याकडे केवळ एकच कार उरली आहे. तसेच रोजच्या खर्चासाठीही मी मुलाकडून कर्ज घेतल्याचा खुलासा अनिल अंबानी यांनी केला.



अंबानी यांनी चीनमधील 3 बँकांकडून ४ हजार ७६० कोटीचे  कर्ज घेतल आहे. त्याची वसुली करण्यासाठी या बँकांनी लंडनमधील न्यायालयात अंबानी यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. या बँकांनी कर्जाच्या वसुलीसाठी अनिल अंबानी यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मागितली आहे.