भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू उर्फ फातिमा 29 नोव्हेंबरला मायदेशात परतल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंजू सध्या दिल्लीत असून नुकतंच 'आजतक'शी संवाद साधताना तिने पाकिस्तानमधील आपला अनुभव शेअर केला आहे. तसंच भविष्यातील योजना काय आहेत याबाबतही खुलासा केला आहे. लोकांनी जर माझी बाजू ऐकून घेतली तरच त्यांना मी समजू शकते. आतापर्यंत लोक माझ्याबद्दल फक्त चुकीचे विचार करताना दिसले आहेत अशी खंत तिने व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानमधून परतल्यानंतर अंजूकडे संशयानेही पाहिलं जात आहे. ती पाकिस्तानची गुप्तहेर म्हणून तर परतलेली नाही ना? किंवा ती आपल्या पहिल्या पती आणि मुलांसोबत राहणार की पुन्हा पाकिस्तानात नसरुल्लाहकडे परतणार? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. 


अंजूने मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरं दिली असून आपण सध्या आपल्या मुलांसोबत राहत असल्याची माहिती दिली. आपण आपल्या पहिल्या पतीसोबत राहणार नसल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे. अंजूचा पहिला पती अरविंद भिवाडीत आहे. अंजू दिल्लीपासून जवळच आपल्या मुलांसोबत राहत आहे. 


'मी दोघांची पत्नी'


फातिमा झालेल्या अंजूने यावेळी सांगितलं की, "मी दोघांची पत्नी आहे. पण राहणार त्याच्यासोबतच ज्याच्याशी मी मनाने लग्न केलं आहे. कायद्यानुसार मी अद्यापही अरविंदची पत्नी आहे आणि तिथे निकाह केला असल्याने त्याचीही आहे. मी अद्याप घटस्फोटासाठी अर्ज दिलेला नाही. पुढे मुलांच्या भविष्यानुसार मी निर्णय घेईन".


अंजूने यावेळी आपण 17 वर्षांची असतानाच वडिलांनी इच्छेविरोधात अरविंदशी लग्न लावून दिलं होतं अशी माहिती दिली. सुरुवातीपासून आमच्यात काहीच जुळत नव्हतं. अरविंदच्या कुटुंबाने माझ्यापासून अनेक गोष्टी लपवल्या होत्या. मुलगी झाल्यानंतरही आमच्यातील नातं तसंच राहिलं. नंतर आम्ही राजस्थानच्या अलवरमध्ये येऊन राहू लागलो. तिथेही अरविंद नोकरी करत होता. मुलगा झाल्यानंतर दोघे वेगळे राहू लागले असं तिने सांगितलं. 


आपण अरविंदला घटस्फोट न देताच नसरुल्लाहशी लग्न केलं ही चूक झाल्याचं अंजूने यावेळी मान्य केलं. तिने नसरुल्लासंबंधी बोलताना सांगितलं की, "जर त्याने माझा स्विकार केला आहे, तर माझ्या मुलांचाही केला आहे. मी सध्या मुलांमध्ये व्यग्र आहे. जर मुलं पाकिस्तानात जाण्यास तयार असतील तर त्यांना घेऊन जाईल. पण जर ते तयार नसतील तर नसरुल्लाह भारतात येईल". आपण प्रेमाने त्याला खानू म्हणत असल्याचंही तिने सांगितलं.