भगवंत मान यांची लोकांसाठी आणखी एक मोठी घोषणा, पण अटी आणि नियम लागू
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार आल्यानंतर त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.
चंढीगड : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. राज्यातील लोकांना 300 यूनिट मोफत वीज देण्याची घोषणा पूर्ण केली आहे. सरकारने शनिवारी घोषणा केली की, 1 जुलैपासून 300 यूनिट मोफत वीज दिली जाईल. पण यामध्ये काही अटी असणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारने 31 डिसेंबरपर्यंत काही वीज बिले माफ करण्याची घोषणा देखील केली आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं की, जर कोणत्याही घरात 2 महिन्यात 600 यूनिटपेक्षा अधिक विजेचा वापर होत असेल तर त्यांना बिल भरावं लागेल. अनुसूचित जाती, मागासवर्ग आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना तसेच स्वातंत्र्य सेनानी यांना 600 यूनिटपर्यंतची वीज मोफत दिली जाणार आहे. 600 च्या वरच्या यूनिटचं बिल भरावं लागणार आहे.
या कुटुंबांना आधी 200 यूनिटपर्यंत मोफत वीज दिली जात होती. मुख्यमंत्र्य़ांनी म्हटलं की, उद्योग आणि कमर्शियल ग्राहकांसाठी कोणतेही दर वाढवले जाणार नाहीत. कृषी क्षेत्राला मोफत वीज दिली जाईल. याचा फायदा 80 टक्के जनतेला होणार आहे.
मान यांचा दावा आहे की, पंजाबमध्ये जवळपास 73 लाख ग्राहक आहेत. 61 लाखा लोकांना याचा फायदा होणार आहे. सरकारने 2 KW लोड असणाऱ्या लोकांचं 31 डिसेंबर 2021 पर्यंतचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली आहे. 'लोकांना मोफत वीज, स्वस्त वीज तसेच ट्रान्समिशन लॉस, कोळश्याची कमी आणि कायदेशीर बाबी या सारख्या अडचणी आहेत. ज्या सोडवण्यासाठी काम करत आहोत. असं ही मान यांनी म्हटलं आहे.'