मुंबई : कोरोनाचे नवनवे दुष्परिणाम समोर येत आहेत. आता कोरोनामुळे चक्क तुम्हाला येणारे वासच बदलतात, अशी धक्कादायक माहिती आहे. वास न येणं किंवा चव न लागणं म्हणजे कोरोनाचं लक्षण आहे, हे एव्हाना आपल्याला माहिती झालं आहे. पण गंध येण्याची क्षमता कायमची बदलली तर ? अशी काही उदाहरणं समोर आली आहेत. कोरोना होऊन गेल्यानंतर आवडणारा वास नकोसा होणं, वस्तू जळल्याचा किंवा उंदीर मेल्याचा वास तसं काही घडलेलं नसताना येतो. याला वैद्यकीय भाषेत पॅरोस्मिया म्हणतात... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरस नर्व्ह फायबर नष्ट करतात. त्यामुळे मेंदूपर्यंत सिग्नल जात नाही. काही काळानं नर्व्ह फायबर पुन्हा तयार होते. मात्र तो मेंदूतील चुकीच्या टर्मिनलला सिग्नल द्यायला लागतो. या क्रॉस कनेक्शनमुळे पॅरोस्मियाची स्थिती होते. कोरोनातून बऱ्या झालेल्या जवळजवळ 60 लाख लोकांमध्ये पॅरोस्मियाची लक्षणं आढळली आहेत. नेमक्या कारणांचा अद्याप छडा लागला नसला तरी एक थिअरी सांगितली जाते आहे.


कोणत्याही वस्तूमध्ये अनेक प्रकारचे गंध एकत्रित असतात. मात्र कोरोनामुळे गंधपेशींची काही वासांची क्षमता संपून जाते. उदाहरणार्थ, कॉफी वेगवेगळ्या कम्पाऊंडपासून बनते. त्यात सल्फरचा वासही असतो. तो इतर गंधांसोबत छान वाटतो. मात्र एकट्या सल्फरचा वास आला, तर तो असह्य होतो. पॅरोस्मियामध्ये काहीसं असंच काहीसं होत असावं.


सामान्य तापमानाचं अन्न खाणं, फ्राईड फूड, कांदा-लसूण, कॉफी यापासून काही काळ दूर राहणं हे यावरचे तात्पुरते उपाय आहेत. मात्र पॅरोस्मियावर औषध उपलब्ध होत नाही, तोपर्यंत त्याच्याशी अॅडजेस्ट करणंच चांगलं.