नवी दिल्ली : एम्स रुग्णालयातील श्वसन तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्र नाथ पांडे यांचा  कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते ७९ वर्षांचे होते.  शनिवारी त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. महत्त्वाचं म्हणजे याच आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा फैलाव झाल्यापासून ते कोरोना रुग्णांवर उपचार करत होते. कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना त्यांना देखील कोरोनाची लागण झाली. डॉक्टर पांडे यांनी एम्स रुग्णालयासाठी मोठं योगदान दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एम्स रुग्णालयाचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, डॉ. पांडे आणि त्यांच्या पत्नीमध्ये कोरोनाची किरकोळ लक्षणं दिसून आली होती. मंगळवारी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना  त्यांच्या राहत्या घरी आयसोलोशनमध्ये ठेवण्यात आले होते. डॉ रणदीप गुलेरिया हे डॉक्टर पांडे यांचे विद्यार्थी आहेत. 


डॉ. पांडे यांना अन्य आजार देखील होते. कोरोनाची लागण आणि तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून सध्या त्यांच्या पत्नीवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू येत आहेत.  अशी माहिती डॉ रणदीप गुलेरिया यांनी दिली. 


दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत देशात १ लाख २५ हजार १०१ लोकांना कोरोनाची लागण झाली  आहे. त्यापैकी ३ हजार ७२० रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे  ५१ हजार ७८३ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहेत.