मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात दुस-या आलेल्या अनु कुमारीची कहाणीही थोडी वेगळी आहे... 31 वर्षीय अनु कुमारी हरयाणातल्या सोनीपतमध्ये राहते. अविवा लाइफ इन्शुरन्स या खासगी कंपनीत दीड लाख रूपये पगाराची नोकरी सोडून तिनं यूपीएससी परीक्षा दिली आणि दुस-या प्रयत्नात ती यशस्वी ठरली. विशेष म्हणजे चार वर्षाच्या मुलाची आई असणा-या अनुनं कुटुंब सांभाळत हे यश संपादन केलंय... अनुला भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू व्हायचंय. या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न होणार असल्याचं त्यांनी सांगितलं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत ३१ वर्षीय अनु कुमारी देशात दुसरी आली आहे. हरयाणातील सोनिपतमध्ये राहणाऱ्या अनु कुमारीने खासगी कंपनीतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससीची परीक्षा दिली आणि दुसऱ्याच प्रयत्नात ती यशस्वी ठरली. विशेष म्हणजे चार वर्षाच्या मुलाची आई असणाऱ्या अनुने आपले कुटुंब सांभाळत हे यश संपादन केले आहे.
अनुने दिल्ली विद्यापीठातील हिंदू महाविद्यालयातून भौतिक शास्त्रात पदवी प्राप्त केली तर नागपूरच्या आयएमटीमधून तिने एमबीए पूर्ण केले. अनुने तब्बल नऊ वर्षे खासगी कंपनीत काम केले. पण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने अखेर नोकरीला रामराम केला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.


माझे काम चांगलं होतं. पण मला हे काम करताना आत्मिक समाधान मिळत नव्हतं. हे सर्व यांत्रिक पद्धतीचं काम वाटू लागलं होतं. एका क्षणी मला जाणवलं की आता आपण थांबावं. त्यावेळी मी ठरवलं की, आपण समाजासाठी काही तरी करता येईल, असं काम करू, असे तिने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. सुमारे दोन वर्षांपूर्वी अनुने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. त्यावेळी ती अविवा लाइफ इन्शुरन्समध्ये काम करत होती. नोकरी सोडल्यानंतर तिने यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. वर्ष २०१६ मध्ये यूपीएससीची परीक्षा पहिल्यांदाच दिली होती. अवघ्या दोन महिन्यात तिने अभ्यास करून चांगली कामगिरी करून दाखवली. फक्त एक गुणाने त्यावेळी तिची संधी हुकली.


तांत्रिकदृष्ट्या हा माझा दुसरा प्रयत्न होता. पण तसं पाहिलं हा माझा पहिलाच होता. कारण मागील वेळी मी गांभिर्याने तयारी केली नव्हती. उत्तीर्ण झाल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. कारण पुढची वेळ कदाचित माझ्यासाठी शेवटची ठरली असती, असेही ती म्हणाली.


अनुला भारतीय प्रशासकीय सेवेत रूजू व्हायचं आहे. या पदाच्या माध्यमातून महिला आणि बालकांची काळजी घेणार असल्याचे ती म्हणाले. मी हरयाणातून आलेली आहे. महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचीही ते म्हणाली. तुझ्या यशाचा मंत्र कोणता असं विचारले असता ती म्हणाली की, मी या परीक्षेसाठी कोणताही कोचिंग क्लास लावला नाही. मी माझं ध्येय ठरवलं होतं, मी स्वयंअध्ययन केलें असे तिने सांगितले. अनुचे पती एक उद्योगपती आहेत.