चीनला धक्का, भारतात `आयफोन-११`च्या उत्पादनाला सुरुवात
ऍपलने चीनला धक्का देत भारतामध्ये आयफोन-११ च्या उत्पादनाला सुरुवात केली आहे.
मुंबई : ऍपलने चीनला धक्का देत भारतामध्ये आयफोन-११ च्या उत्पादनाला सुरुवात केली आहे. चेन्नईच्या फॉक्सकॉन प्लांटमध्ये आयफोन-११ च्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच आयफोनचं टॉप मॉडेल तयार केलं जात असल्याचं ऍपलकडून सांगण्यात आलं आहे. आयफोन-११ शिवाय कंपनी iPhone SE 2020 मॉडेलही भारतात बनवण्याचा विचार करत आहे. असं झालं तर या मॉडेलची निर्मिती बंगळुरूच्या विस्टर्न प्लांटमध्ये केली जाईल.
केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी याबाबतचं ट्विट केलं. मेक इन इंडियासाठी हे चांगले संकेत आहेत. आयफोन-११ चं उत्पादन भारतामध्ये सुरू होतंय. आयफोनच्या टॉप मॉडेलपैकी एक भारतात बनणार आहे, असं पियुष गोयल म्हणाले आहेत.
टेक गेंटने २०१९ साली iphone XRचं भारतामध्ये असेंबलिंग करायला सुरुवात केली होती. २०१७ साली ऍपलने iphone SEचं काम बंगळुरूमध्ये सुरू केलं होतं. फॉक्सकॉन ही कंपनी ऍपलची सगळ्यात मोठी पुरवठादार आहे. फॉक्सकॉन कंपनी भारतातल्या फॅक्ट्रीमध्ये १ बिलियन डॉलर गुंतवणूक करायच्या तयारीमध्ये आहे.