`तृतीयपंथी` एवढीच अप्सरा रेड्डींची ओळख नाही तर...
अप्सरा मूळची आंध्र प्रदेशातली... तिचं शालेय शिक्षण चेन्नईत झालं
नवी दिल्ली : अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी पहिल्यांदाच एका तृतीय पंथीयाची नेमणूक करण्यात आलीय. अप्सरा रेड्डी असं त्यांचं नाव... काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सुश्मिता देव यांनी तिची या पदावर नेमणूक केलीय. १३३ वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेससारख्या बड्या राजकीय पक्षानं एका तृतीयपंथीय व्यक्तीवर एवढी मोठी जबाबदारी सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे... मात्र तृतीयपंथीय एवढीच तिची ओळख नाहीय.
- अप्सरा मूळची आंध्र प्रदेशातली... तिचं शालेय शिक्षण चेन्नईत झालं
- त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठातून तिनं पत्रकारितेची पदवी घेतली
- लंडन सिटी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं
- ऑस्ट्रेलिया आणि लंडनमध्ये असतानाच तिनं तृतीयपंथीयांच्या अधिकारांसाठी संघर्ष सुरू केला
- विविध माध्यम समूहांमध्ये त्यांनी पत्रकारिता केली
- ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांच्यापासून मायकल शूमाकर, अमिताभ बच्चन, निकोलस केज, ए. आर. रहमान आदी अनेकांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या
राजकीय प्रवेश
समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी त्यांनी एलजीबीटी चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. मानवी हक्कांचं उल्लंघन टाळण्यासाठी आवाज बुलंद केला. महिला आणि लहान मुलांच्या शोषणाविरोधात संघर्ष केला. टीव्हीवरील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. फॅशन शोमध्ये सहभाग घेतला. एवढंच नव्हे तर फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय वाटचाल सुरू केली. मात्र अवघ्या दोन महिन्यांतच त्यांनी भाजपला रामराम करुन एआयडीएमकेची वाट धरली. अप्सरावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र जयललिता यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी आता काँग्रेसचा हात हातात घेतलाय.
दरम्यान, आपली नियुक्ती ही केवळ प्रसिद्धीचा प्रयत्न नाही. तर महिलांसाठी काम करण्याचा आपला मनोदय असल्याचंही त्यांनी यावेळी सांगतिलं. 'देश बदल रहा है...' या मोदी सरकारच्या दाव्याबद्दल वाद प्रतिवाद असू शकतात. मात्र राजकीय पक्ष निश्चितच बदलतायत, हे अप्सरा रेड्डीच्या नेमणुकीनं स्पष्ट झालंय...