Trending News : छोट्यांपासून-मोठ्यांपर्यंत भूक लागली पोटपूजा करण्यासाठी अगदी झटपट तयार होणारा चवदार पदार्थ म्हणजे मॅगी (Maggi). मॅगीची वाढती पसंती लक्षात घेऊन भेसळखोरांनी याच मॅगीला लक्ष्य केलंय. एका छोट्याशा कारखान्यात मॅगी मसाल्यात (Maggi Masala) राजरोसपणे भेसळ केली जात होती. नकली मॅगी मसाला तयार करून तो मॅगीच्या पाऊचमध्ये भरला जायचा. नंतर हे सगळे पाऊच बॉक्समध्ये भरून त्याची बाजारात विक्री केली जायची. हरियाणातल्या (Harayana) फरिदाबादमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. मात्र पोलिसांना नकली मॅगी मसाल्याची कुणकुण लागली आणि छापा मारत त्यांनी भेसळखोरांचा पर्दाफाश केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भेसळखोरीच्या कारखान्यातून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नकली मॅगी मसाला जप्त केलाय. या रॅकेटनं आतापर्यंत कुठे कुठे या नकली मसाल्याची विक्री केलीय त्याचा पोलीस शोध घेतायेत. 


बाजारात विकले जाणारे खाद्यपदार्थ आरोग्यास पुरक आहेत की नाही यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (Food and Drug Administration) वेळोवेळी सँपल टेस्टिंग (Sample Testing) केली जाते. 2018-19 या वर्षात जवळपास 1 लाख 6 हजार 459 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्यातील 28 % नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचं स्पष्ट झालंय. यातून भेसळखोरीची पाळंमुळं किती खोलवर रूजलीयेत हे स्पष्ट होतंय. त्यामुळे बाजारातून सामान खरेदी करताना पॅकिंगची तारीख, एक्स्पायरी डेट, FSSAIचं लेबल या सगळ्या बाबी तपासूनच खरेदी करा, कारण सवाल तुमच्या आरोग्याचा आहे.