VIDEO : `तुझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य.. `, चिमुकल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूर धावला, म्हणतो `वडिलांच्या निधनानंतर...`
Arjun Kapoor offers to help Jaspreet : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या जसप्रीतच्या मदतीसाठी अर्जुन कपूरने मदतीचा हात समोर केला आहे.
Arjun Kapoor offers to help Jaspreet : हिरवा टी-शर्ट आणि गडद निळ्या रंगाच्या पगडीमधील एका चिमुकल्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिल्लीतील टिळक नगर मधील हा चिमुकला (Jaspreet Delhi boy selling rolls) मुलगा एग रोल आणि चिकन रोल विकताना या व्हिडीओमध्ये दिसतोय. एका नेटकऱ्याने जेव्हा या मुलाला त्याची कहाणी विचारली, तेव्हा सर्वच स्तब्ध झाले. वय वर्ष 10.. पण पोराचं जिगरा मोठा... या पंजाबी चिमुकल्या मुलाने म्हणजेच जसप्रीतने अवघ्या 10 वर्षी म्हणजे जेव्हा तुम्ही आम्ही बागडत होतो, तेव्हापासून आयुष्याचं बाळकडू प्यायला सुरूवात केली. वडिलांच्या मृत्यूनंतर पुन्हा वडिलांनी उभा केलेल्या व्यवसायाचं बस्तान बसवलं. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेला हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला होता. अशातच आता बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर (Arjun Kapoor) या चिमुकल्याच्या मदतीला धावला आहे.
काय म्हणाला अर्जुन कपूर?
चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन, तो पुढच्या आयुष्याला सामोरं जात आहे आणि त्यासोबत येणाऱ्या सर्व गोष्टींचा सामना करून... या 10 वर्षाच्या चिमुरडीला वडिलांच्या निधनानंतर 10 दिवसांच्या आत स्वतःच्या हिंमतीवर उभं राहून वडिलांचं काम हाती घेण्याचं धाडस दाखविल्याबद्दल मी त्याला सलाम करतो, असं अर्जुन कपूर म्हणाला आहे.
मला त्याच्या आणि बहिणीच्या शिक्षणात मदत करायला आवडेल. कोणाला त्याचा ठावठिकाणा माहीत असल्यास कृपया मला कळवा, असं आवाहन अर्जुन कपूरने नेटकऱ्यांना केलं आहे.
एका नेटकऱ्याने हा जसप्रीतचा व्हिडीओ शुट केला, तेव्हा त्याला काही प्रश्न विचारले. एवढ्या कमी वयामध्ये तुला एग आणि चिकन रोल बनवण्यास कोणी शिकवलं? तेव्हा, माझ्या वडिलांनी शिकवलं.. असं उत्तर देत जसप्रीतने गोड स्माईल दिली. पुढे संवाद साधताना, माझ्या वडिलांचं निधन झाल्याचं देखील जसप्रीतने सांगितलं. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी देखील हा व्हिडीओ शेअर केला होता अन् चिमुकल्याला मदतीचं आश्वासन दिलं आहे.
काय म्हणाले आनंद महिंद्रा?
"हिंमतीचं दुसरं नाव जसप्रीत आहे. तो सध्या व्यवसाय करत असल्याने त्याच्या शिक्षणावर परिणाम होता कामा नये," अशी इच्छा महिंद्रांनी व्यक्त केली आहे. "मला वाटतं हा दिल्लीतील टिळक नगरमधील व्हिडीओ आहे. कोणाकडे त्याचा कॉनटॅक्ट नंबर असेल तर तो शेअर करा प्लीज. महिंद्रा फाऊंडेशनची टीम त्याच्यासंदर्भात विचार करुन त्याच्या शिक्षणासाठी आम्ही कशी मदत करु शकतो याची चाचपणी करेल," असं आनंद महिंद्रांनी म्हटलं आहे.