रशिया-युक्रेन युद्धावर लष्करप्रमुखांचं मोठं वक्तव्य, युद्ध कधीही होऊ शकतं, आपल्याला...
भारताचे लष्करप्रमुख मुकुंद नरवणे यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या संघर्षावरुन धडा घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.
नवी दिल्ली : युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाला 13 दिवस झाले आहेत. पण संघर्ष कायम आहे. कोणताही देश मागे हटण्यास तयार नसल्याने हे युद्ध आणखी काही दिवस चालेल अशी शक्यता आहे. पण या युद्धापासून अनेक देशांनी धडा घेतला आहे. या युद्धांचा परिणाम तसा अनेक देशांवर होतो आहे.
युक्रेनवर रशियाकडून होत असलेल्या हल्ल्याने मोठी हानी होत आहे. अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यातच आता भारताच्या लष्करप्रमुखांनी या युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे.
लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. या युद्धातून भारताने घेतलेल्या काही धड्यांचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, आमच्यासाठी सर्वात मोठा धडा हा आहे की भविष्यातील युद्धांमध्ये आम्हाला देशात बनवलेल्या शस्त्रास्त्रांनीच लढावे लागेल. संरक्षण क्षेत्रात आपल्याला आत्मनिर्भर भारताला अधिक वेगाने पुढे जायचे आहे.
जनरल मुकुंद नरवणे म्हणाले की, भविष्यातील युद्धे आपल्याच शस्त्रांनी लढायची आहेत. या संकटाने आपल्याला दाखवून दिले आहे की युद्ध कधीही होऊ शकते आणि आपल्याला त्यांचा सामना करण्यासाठी सदैव तयार राहावे लागेल. ते म्हणाले की युद्धे केवळ गतिमान नसून ती शारीरिकदृष्ट्याही लढली जातील.
एका कार्यक्रमात बोलताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, रशिया आणि पूर्व युरोपीय देश यांच्यातील युद्धात सैनिक शारीरिकदृष्ट्या एकमेकांसमोर आहेत. ते म्हणाले की या युद्धाने हे दाखवून दिले आहे की पुढे आणखी परंपरागत युद्धे होऊ शकतात.