तीन `बॅचमेट` सांभाळणार देशाच्या संरक्षणाची धुरा
पाहा काय आहे त्यांच्यातील नातं....
नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे (General Manoj Mukund Naravane) आजच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०१९ला लष्कर प्रमुखपदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. जनरल बिपीन रावत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नरवणे यांच्या हाती ही सूत्र जाणार आहेत. जनरल रावत हे यापुढे देशाचे पहिले सीडीएस म्हणजेच सैन्यदल प्रमुख असणार आहेत.
देशाच्या संरक्षण फळीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. ज्यामध्ये आर.के.एस. भदौरिया (Air Chief Marshal RKS Bhadauria) यांनीही काही दिवसांपूर्वीच भारतीय वायुदल प्रमुख पदाची धुरा सांभाळली. तर, देशाच्या नौदल प्रमुखपदी करमबीर सिंग (Navy Chief Admiral Karambir Singh) त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत. लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख आणि वायुदल प्रमुखपदी असणाऱ्या या तिन्ही अधिकाऱ्यांची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. ज्यामध्ये त्यांच्यात साम्य असणाऱ्या बऱ्याच गोष्टीही अनेकांचं लक्ष वेधत आहेत.
तिन्ही अधिकाऱ्यांमध्ये साम्य असणारी पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे वडील आणि भारतीय वायुसेना. या तिघांच्याही वडिलांनी वायुसेनेमध्ये विविध पदांवर राहत देशाची सेवा केली आहे. लष्कर प्रमुख नरवणे आणि ऍडमिरल सिंग यांचे वडील तर एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. तर, वायुदल प्रमुख भदौरिया यांचे वडील हे निवृत्त फ्लाईंग ऑफिसर आहेत.
वाचा : ...म्हणून सैन्यदल वाहनांच्या चाकांना लावली जाते साखळी
सध्याच्या घडीला देशाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेले हे तिन्ही अधिकारी एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या वर्ष १९७६चे विद्यार्थी आहेत. थोडक्यात हे तिघंही एनडीए कोर्सच्या ५६व्या तुकडीचा भाग होते. पुण्यातील एनडीएमध्ये त्यांनी रितसर शिक्षण घेत त्यानंतर आपआपल्या सर्व्हिस अकॅडमीची वाट धरली. पण, त्यांनी ही वाट एकाच वर्षी सुरु केली होती. ही बाब फार कमी वेळा निदर्शनास आली आहे की एनडीएतून एकाच वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी इतक्या महत्त्वाच्या पदांचा पदभार स्वीकारला आहे.
असं म्हटलं जातं की, यापूर्वी १९९१मध्ये तत्कालीन लष्कर प्रमुख सुनीत फ्रांसिस रोड्रीग्ज, एडमिरल लक्ष्मी नारायण रामदास आणि एअर चीफ मार्शल निर्मल चंद्र सूरी यांनीही एनडीएमध्ये एकत्र शिक्षण घेतलं होतं. लष्कर, वायुदल आणि नौदल अशा तिन्ही संरक्षण तुकड्यांच्या प्रमुखपदी असणाऱ्या या अधिकाऱ्यांमध्ये असणाऱ्या या अनोख्या दुव्यामुळे आता येत्या काळात तिन्ही दलांमध्ये एकत्र येत देशसंरक्षमार्थ काही महत्त्वाची पावलं उचलली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.