नवी दिल्ली: पँगाँग लेकच्या परिसरातील घुसखोऱीची घटना ताजी असतानाचा चिनी सैन्याने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चेपुझी छावणीच्या परिसरात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. यावेळी चिनी लष्कराची सात ते आठ अवजड वाहने भारतीय हद्दीच्या दिशेने मार्गक्रमण करत होती. ही गोष्ट भारतीय सैनिकांच्या लक्षात येतात तातडीने हालचाली करण्यात आल्या. यानंतर भारतीय लष्कराकडून सुरक्षेचा उपाय म्हणून या भागात मोठी कुमक तैनात करण्यात आली. अंधाराचा फायदा उठवण्यासाठी चिनी सैनिकांनी काळे पोशाख आणि हेल्मेटस परिधान केली होती. मात्र, भारतीय जवान कमालीचे सतर्क असल्याने चिनी सैन्याच्या या हालचाली टिपण्यात यश आले. भारतीय सैन्य सावध झाल्याचे पाहून चिनी वाहनांचा ताफा त्यांच्या तळाच्या दिशेने परतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर आज पुन्हा चुमार परिसरात चिनी सैन्याकडून घुसखोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. या दोन घटनानंतर आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सर्व भारतीय चौक्यांवरील सैनिक कमालीचे सतर्क आहेत. गेल्या तीन दिवसांत चीनने तीनदा घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. मात्र, भारतीय जवानांनी हे सर्व प्रयत्न हाणून पाडले आहेत.



गलवान खोऱ्यातील रक्तरंजित संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. या संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यात राजनैतिक आणि लष्करी स्तरावर सातत्याने बोलणी सुरु होती. परंतु, २९-३० ऑगस्टच्या रात्री चिनी सैन्याने पँगाँग लेकच्या परिसरातील भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. मात्र, सावध असलेल्या भारतीय लष्कराने हा डाव हाणून पाडला होता. यानंतर चीनने पुन्हा घुसखोरीचे प्रयत्न केल्याने आता सीमारेषेवरील तणावात प्रचंड भर पडली आहे. 



या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्रमंत्रालयाकडून मंगळवारी एक प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आले. पश्चिम भागातील सीमारेषेवर निर्माण झालेला वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यावर भारत ठाम आहे. ३१ ऑगस्टला दोन्ही बाजूच्या सैन्याधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चिनी सैन्याकडून आगळीक घडली. मात्र, भारतीय सैन्याने वेळेत उचललेल्या संरक्षणात्मक पावलांमुळे दोन्ही बाजूंनी सहमती असलेली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न फोल ठरला. राजनैतिक आणि लष्करी पातळीवर आम्ही चिनी सैन्याच्या या प्रक्षोभक कृतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच चीनने त्यांच्या आघाडीवरील सैन्याला अशाप्रकारचे प्रक्षोभक कृत्य टाळण्याच्यादृष्टीने नियंत्रणात ठेवावे, असेही सांगण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.