म्हैसूर महापालिकेने थकवले मूर्तीकार अरुण योगीराज यांचे पैसे; भाजप आमदाराचा आरोप
Arun Yogiraj : अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती घडवून प्रसिद्धीझोतात आलेले मूर्तीकार अरुण योगीराज यांनी धक्कादायक दावा केला आहे. कर्नाटकातील भाजप आमदाराने हा सगळा प्रकार समोर आणला आहे.
Arun Yogiraj : अयोध्येतील राम मंदिरासाठी रामलल्लांची मूर्ती बनवणारे अरुण योगीराज सध्या चर्चेत आहेत. बालरुपातील रामाची अप्रतिम प्रतिमा पाहण्यासाठी राम भक्तांची गर्दी राम मंदिरात होत आहे. रामलल्लांची मूर्ती साकारण्यासाठी स्वतः भगवान रामाने त्यांना मदत केली होती, असे अरुण योगीराज यांनी म्हटलं आहे. अशातच आता भाजपच्या एका आमदाराने अरुण योगीराज यांच्याबाबत दावा केला की, त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. मात्र, अरुण योगीराज यांना रामलल्लाच्या मूर्तीसाठी नव्हे तर म्हैसूर महानगरपालिकेने वोडेयार घराण्याच्या राजाच्या पुतळ्याच्या शिल्पासाठी पैसे दिलेले नाहीत.
भाजप आमदार बसनगौडा आर पाटील यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील पोस्ट लिहीली. '2016 मध्ये अरुण योगीराज यांनी श्री जयचामराजेंद्र वोडेयर यांचा पुतळा बनवला होता. त्याला आजपर्यंत एकूण आठ वर्षे झाली, पण म्हैसूर महापालिकेने योगीराज यांना कामाचा मोबदला दिलेला नाही. हा एका शिल्पकाराचा तसेच यदुवंशाच्या राजाचा अपमान आहे,' असे बसनगौडा आर पाटील यांनी म्हटलं आहे.
बसनगौडा पाटील यांनी दावा केला की, म्हैसूर महानगरपालिकेकडे अद्याप 12 लाख रुपये आहेत, जे योगीराजांना द्यावे लागतील. त्यावर म्हैसूर महानगरपालिकेचे म्हणणे आहे की, योगीराज यांना पैसे दिले नसल्याची अद्याप कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही. ते रेकॉर्ड तपासतील आणि त्यानंतर भाजप आमदाराच्या आरोपांना उत्तर देतील. दरम्यान, ही थकबाकी अरुण योगीराज यांच्या हार्डिंग सर्कलमध्ये बसवलेल्या जयचामराजा वाडियार पुतळ्याच्या कामाशी संबंधित आहे.
दुसरीकडे, म्हैसूर महापालिकेचे माजी महापौर शिवकुमार यांनीही या सगळ्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी शिल्पकार अरुण योगीराज यांना 12 लाख रुपये देण्यास म्हैसूर महापालिका अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. "म्हैसूर महापालिकेने केलेल्या कामाचा मोबदला न देऊन प्रसिद्ध शिल्पकाराला कसे वागवले हे धक्कादायक आहे. अरुण योगीराज यांनी अयोध्येत बालकराम मूर्तीचे काम करून आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवली असून म्हैसूर महापालिका त्यांना त्रास देत आहे. किमान आता तरी, म्हैसूर महापालिकेने आपली चूक लक्षात घेतली पाहिजे आणि म्हैसूरच्या कलात्मक आणि सांस्कृतिक वारशासाठी त्यांचे योगदान ओळखून थकबाकीची रक्कम दिली पाहिजे," असे शिवकुमार म्हणाले.
शुक्रवारी पत्रकारांनी बोलताना अरुण योगीराज यांनीही या प्रकारावर भाष्य केलं. 'म्हैसूर महापालिकेने मला 2015 मध्ये जयचामराजा वाडियार पुतळ्यासाठी केलेल्या कामाचे 12 लाख रुपये दिले नाहीत. तेव्हापासून मी महापालिकेकडे गेलो नाही,' असे अरुण योगीराज यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सहा हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. दुसऱ्या दिवसापासूनच राम मंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. रामलल्लांच्या दर्शनासाठी दररोज लाखो लोक मंदिरात पोहोचत आहेत. तीन मूर्तींपैकी एक मूर्ती राम मंदिराच्या गर्भगृहात ठेवण्यासाठी निवडण्यात आली होती. रामलल्लांची ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवली आहे.