मुंबई : देशाच्या वायुदल प्रमुख पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच माध्यमांशी संवाद साधताना एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी शेजारी राष्ट्रांकडून सुरु असणाऱ्या हालचालींवर एक कटाक्ष टाकला. यावेळी त्यांनी वायुदलाचं सामर्थ्य आणखी वाढवण्यास राफेल कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत, हेसुद्धा स्पष्ट केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाचे २६वे वायुदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर भदौरिया यांनी भारतीय वायुदल हे गरज पडेल तेव्हा कोणत्याही कारवाईसाठी सज्ज असल्याचा विश्वास देशवासियांना दिला. सोबतच पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांना त्यांच्या या वक्तव्यातून एक इशाराही मिळाला. 
राफेलच्या कार्याविषयी प्रतिक्रिया देत भदौरिया म्हणाले, 'राफेल हे अतिशय अद्ययावत प्रकारचे लढाऊ विमान आहे. आपल्या कारवाईमध्ये राफेलमध्ये सारा डाव पालटण्याची क्षमता आहे. पाकिस्तान आणि चीनसोबतची परिस्थिती हाताळण्यासाठी राफेलची मदत होणार आहे'. 


आम्ही तेव्हाही तयार होतो आणि यापुढेही तयार असू, असं म्हणत कोणत्याही आव्हानाला आणि धमकीला तोंड देण्यास आपलं वायुदल सज्ज असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. बालाकोट येथे पुन्हा एकदा दहशतवादी तळ सक्रिय झाल्याची माहिती आपल्यापर्यंत आली असल्याची बाबही त्यांनी यावेळी स्वीकारली. 




इम्रान खान यांच्या वक्तव्याविषयी म्हणाले... 


वायुदलाच्या सामर्थ्याविषयी आणि आपल्या नव्या जबाबदारीविषयी बोलताना त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. काश्मीर मुद्द्यावरुन अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या इम्रान खान यांचं ते वक्तव्य म्हणजे अण्वस्त्रांविषयीची त्यांचा दृष्टीकोन आहे. यावर आमचा दृष्टीकोन आणि वेगळा आहे असं ते म्हणाले. सोबतच येणाऱ्या प्रत्यक आव्हानासाठी आपण तयार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. 



सोमवारी म्हणजे ३० सप्टेंबर, २०१९ या दिवशी भदौरिया यांनी भारतीय वायुदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी एअर चीफ मार्शल धनोआ यांच्याकडून या पदाची सूत्र स्वीकारली. जवळपास ४१ वर्षांच्या सेवेनंतर धनोआ सेवानिवृत्त झाले.