`राकेश रोशन चंद्रावर गेले अन्...`; ममता दीदींनी राकेश शर्मांऐवजी ऋतिकच्या वडिलांनाच अंतराळात पाठवलं; 1 नाही तर 2 घोडचूका
Chandrayaan 3 Moon Landing : चांद्रयानाचं यशस्वी लँडिंग झाल्यानंतर अनेकांनीच त्यावर प्रतिक्रिया दिल्या. नेतेमंडळीही यात मागे राहिले नाहीत. पण, त्यांनी अती घाईत चुका मात्र केल्या...
Chandrayaan 3 Moon Landing : भारतानं पाठवलेलं चांद्रयान 3 चंद्रावर निर्धारित वेळेत उतरलं आणि सर्व स्तरांतून इस्रो (ISRO) अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर आणि शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. नेते, खेळाडू आणि अगदी सर्वसामान्य नागरिकांनीही या यशाचा सोहळा केला. इस्रोचं प्रत्येक ट्विट इथं व्हायरल झालं, चांद्रयानाबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी कुतूहलातही भर पडली. या साऱ्यामध्ये एक नाव उगाचच चर्चेचा विषय ठरलं. ते म्हणजे, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांचं.
आता तुम्ही म्हणाल इथं बॉलिवूड कलाकाराच्या नावाचा संबंध तरी काय? तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी यांनी चांद्रयानाच्या लँडिंगनंतर एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. इथं त्यांनी बोलण्याच्या ओघात भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याऐवजी राकेश रोशन यांच्या नावाचा उल्लेख केला.
हेसुद्धा वाचा : Chandrayaan 3 Rover Landing : 'चंद्रासाठी काहीपण...'म्हणत विक्रम लँडरमागोमाग चंद्रावर प्रज्ञान रोवरचं भ्रमण सुरु
'राकेश रोशन चंद्रावर पोहोचलेले', असं म्हणत मला आठवतंय इंदिरा गांधी यांनी त्यांना चंद्रावरून भारत कसा दिसतो असा प्रश्न विचारल्याचं वक्तव्यसुद्धा बॅनर्जी यांनी केलं. बस्स, मग काय? सोशल मीडियावर या क्षणांचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. मुळात बॅनर्जी यांना इथं राकेश शर्मा यांचाच उल्लेख करायचा होता. पण, त्यांचा गोंधळ उडाला आणि दीदी काहीतरी चुकीचं बोलून गेल्या. एका क्षणात त्यांचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा आणि मीम्सचा पाऊस सुरु झाला.
नेतेमंडळींचा अजाणतेपणा किती....?
बॅनर्जींप्रमाणंच इतरही काही नेत्यांचा चांद्रयान 3 मोहिमेबद्दलचा अजाणतेपणा यावेळी चर्चेचा विषय ठरला. सुभासपा चीफ ओमप्रकाश राजभर यांनीही असंच काहीसं वक्तव्य केलं. 'आम्ही तर देशातील शास्त्रज्ञांचे आभार मानतो, ज्यांनी दर दिवशी संशोधन केलं. चांद्रयान 3 साठीही आम्ही शुभेच्छा गेतो. चांद्रयान 3 सुस्थितीत पृथ्वीवर परतण्याचा जो वेळ आहे तेव्हा त्याचं स्वागत साऱ्या देशानं करावं', असं ते म्हणाले.
लोकप्रतिनिधींचा देशातील अतीव महत्त्वाच्या मोहिविषयीचा अजाणतेपणा म्हणा किंवा अज्ञान म्हणा बऱ्याचजणांना रुचला नाही. किमान यांना मोहिमेची प्राथमिक माहिती तरी असावी असाच सूर यावेळी नेटकऱ्यांनी आळवला. तुम्ही पाहिले का हे व्हायरल व्हिडीओ?