नवी दिल्ली: ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी बुलंदशहर हिंसाचारासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा आधार घेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला डिवचायचा प्रयत्न केला होता. मात्र, तुम्ही स्वत:च घर सांभाळा, इतरांच्या भानगडीत पडू नका, असे सांगत नसिरुद्दीन शाह यांनी इम्रान खान यांना तात्काळ फटकारले. इम्रान खान यांचा या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी इतरांच्या भानगडीत पडण्याऐवजी स्वत:चा देश सांभाळण्याकडे लक्ष द्यावे. आमच्या देशात गेल्या ७० वर्षांपासून लोकशाही आहे. त्यामुळे स्वत:चे प्रश्न कसे हाताळायचे, हे आम्हाला ठाऊक आहे, असे शाह यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर हिंसाचाराविषयी भाष्य करताना नसीरुद्दीन शाह यांनी या देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची मोठी झोड उठली होती. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत इम्रान खान यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. इम्रान खान यांनी म्हटले होते की, नसिरुद्दीन शाह यांनी आता जे म्हटलंय ते पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांनी फार पूर्वीच म्हटले होते. भारतात मुस्लिमांना बरोबरीची वागणूक मिळत नाही हे जिना यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली, असे इम्रान खान यांनी म्हटले होते. 


हिंदू संघटनांच्या विरोधामुळे नसिरुद्दीन शाहांची अजमेर साहित्य संमेलनातून माघार


दरम्यान, या सगळ्या वादामुळे नसिरुद्दीन शहा यांना अजमेर साहित्य संमेलनात जाण्याचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. नसिरुद्दीन शहा आणि त्यांची पत्नी रत्ना पाठक यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार होते. यावेळी ते एका परिसंवादतही सहभागी होणार होते. मात्र, भाजप जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळपासूनच याठिकाणी निदर्शने सुरु केली. या कार्यकर्त्यांनी नसिरुद्दीन शहा यांची पोस्टर्स जाळली. 


याबद्दल आयोजकांना विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, आम्ही सकाळीच पोलिसांना कळवले होते. परंतु, संमेलनाच्या उद्घाटनापूर्वीच काही आंदोलकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेश मिळवला. त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता होती. अखेर आम्ही नसिरुद्दीन शहा यांना फोन करून येथे न येण्याची विनंती केली, असे संमेलनाचे आयोजक रास बिहारी गौर यांनी सांगितले.