मुंबई : पाकिस्तानातून कारवाई करणाऱ्या दहशतवादी संघटनांकडून भारतात काही नव्या ठिकाणांची पाहणी केली जात आहे. भारतातील इतर ठिकाणी दहशतवादी तळ ठोकण्यासाठी या संघटनांकडून या हालचाली सुरु आहेत, ज्याअंतर्गत काही मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची आखणीही करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळेल्या माहितीनुसार (LeT) म्हणजेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणुकीसाठीचा मतदार संघ असणाऱ्या वाराणासीला निशाणा करण्यात आलं आहे. यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार लष्करकडून या ठिकाणी मोठे दहशतवादी हल्ले करुन येथेच दहशतवाद्यांचं तळ करण्याचा मनसुबा आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांच्या तुकड्या आणि काही दहशतवादी वाराणासी आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी करुन गेले आहेत. ज्यानंतर आता ते योग्य ठिकाणाच्या शोधात असून, तेथे तळ ठोकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार उमर मादनी नावाचा एक दहशतवादी त्याच्या नेपाळमधील आणखी एका सहकाऱ्यासोबत मे महिन्यात वाराणासीला आला होता. ज्यावेळी तो या ठिकाणी जवळपास चार दिवसांसाठी वास्तव्य केलं होतं. लष्कर- ए- तोयबाच्या तळासाठी कोणतं ठिकाण योग्य असेल यावर त्यांनी पाहणी केली होती. शिवाय या ठिकाणी कशा प्रकारे मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणता येतील, याविषयीसुद्धा त्यांनी काही विध्वंसक आखणी केली होती. 


हे दहशतवादी ७ ते ११ मे या कालावधीत वाराणासीत एका विश्रामगृहात थांबले होते. यादरम्यान, मादनी याने काहीजणांची भेटही घेतली होती. मादनी हा लष्करसाठी दहशतवाद्यांची निवड करतो. गेल्या काही दिवसांपासून तो या कारवायांसाठी जास्तीत जास्त तरुण वर्गाला समाविष्ट घेण्याच्या प्रयत्नांत होता. ही एकंदर माहिती पाहता, संरक्षण यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.