आमच्या घरात नाक खुपसू नका; ओवैसींनी हिजाब मुद्यावरून पाकला फटकारलं
आमच्या घरच्या प्रश्नात पाकिस्तानं नाक खुपसू नये अशा शब्दात एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसींनी हिजाब वादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानाला सुनावलंय.
नवी दिल्ली : आमच्या घरच्या प्रश्नात पाकिस्तानं नाक खुपसू नये अशा शब्दात एमआयएम खासदार असदुद्दीन ओवैसींनी हिजाब वादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानाला सुनावलंय. आपल्या देशात काय चाललंय ते पाहा असा सल्लाही ओवैसींनी पाकिस्तानला दिलाय.
असदुद्दीन ओवेसी यांनी हिजाब वादावर बोलताना पाकिस्तानलाही आरसा दाखवत आमच्या घरच्या प्रकरणात ढवळाढवळ करू नये असे म्हटले आहे.\
एका मेळाव्याला संबोधित करताना ओवेसी म्हणाले, 'पाकिस्तानबद्दल आम्ही सांगू इच्छितो की मलालावर झालेला हल्ला पाकिस्तानमध्ये झाला. पाकिस्तानच्या घटनेनुसार कोणताही गैर-मुस्लिम त्याचा वझीरे आझम म्हणजेच पंतप्रधान होऊ शकत नाही.
पाकिस्तानला त्यांच्याच शैलीत सल्ला देत ते म्हणाले की, तुमच्यासमोर बलुचींचा मोठा प्रश्न उभा आहे. आमच्या घरातील प्रश्नांमध्ये नाक खुपसू नका.