कोलकता :  पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये उफाळलेल्या जातीय हिंसाचारानंतर खासदार आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी पदाचा राजीनामा आणि राजकारणातून संन्यास घेणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत सुप्रियो यांच मन वळविले आणि त्यांना आपला निर्णय बदलला आहे. 


मोदींचा सल्ला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकारणातून संन्यास अथवा पदाचा राजीनामा देण्यापेक्षा अल्पसंख्याकांचं लांगुलचालन करणाऱ्या पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारविरोधात लढा उभारण्याचा सल्ला पंतप्रधान मोदींनी दिल्याची माहिती बाबुल सुप्रियो यांनी ट्विटद्वारे दिली. 


बाबुल सुप्रियो यांची खंत...


तसंच त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोलही केला. 'ममता बॅनर्जी यांना कोणत्याही परिस्थितीत सत्तेत राहायचं आहे. राज्यात विरोधक शिल्लक राहायला नको, असं तृणमूल काँग्रेसला वाटतं. मुंबई आणि दिल्लीत असताना चांगलं आयुष्य जगत होतो. पण राजकारण आल्यानंतर मला तिरस्काराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं मला प्रचंड नैराश्य आलं आहे, असं ट्विट बाबुल यांनी केलं. 


ममता पाडताहेत समाजात फूट....


कलाकार असल्यानं अनेक मुस्लीम व्यक्तींशी माझी मैत्री झाली. ममता बॅनर्जींच्या राजकारणामुळं समाजात खूप मोठी फूट पडली आहे, असं त्यांचंही मत आहे. मुस्लीम आणि हिंदू हे आगीशी खेळत आहेत. मला हिंदूंसाठी लढणारा नेता असल्याचं म्हटलं जातं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार येण्याआधी हिंदू-मुस्लीम गुण्यागोविंदानं राहत होते. मात्र, फोडा आणि राज्य करा असं ममतांचं धोरण आहे. या सर्व गोष्टींमुळं मी दुःखी झालो आहे. 


राजीनामा दिला पण... 


आसनसोल हिंसाचारानंतर मी पंतप्रधान मोदींना भेटलो आणि पदाचा राजीनामा आणि राजकारणातून संन्यास घेत असल्याचं सांगितलं. मात्र, संन्यास घेण्याऐवजी लढा सुरुच ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यामुळं मी आता ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरोधातील लढा सुरूच ठेवणार आहे, असा निर्धार बाबुल यांनी व्यक्त केला.