RBI ने Paytm वर कारवाई केल्याने अशनीर ग्रोव्हर संतापले, मोदींचा उल्लेख करत म्हणाले `जगासमोर हा दुटप्पीपणा...`
Ashneer Grover on RBI Action against Patym: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) पेटीएमवर (Paytm) केलेल्या कारवाईवर अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी नाराजी जाहीर केली आहे. मला आरबीआयचं नेमकं काय सुरु आहे हे समजत नाहीये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Ashneer Grover on RBI Action against Patym: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) बुधवारी पेटीएमच्या (Paytm) व्यवहारांवर प्रक्रिया करणाऱ्या पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली आहे. आरबीआयने पेटीएमला नवीन ठेवी स्वीकारण्यावर बंदी घातली असून, नवीन पत व्यवहारांवरही निर्बंध आणले आहेत. याशिवाय अनेक प्रकारच्या सेवांसाठी नव्याने ग्राहक जोडता येणार नाहीत. दरम्यान आरबीआयच्या कारवाईवर शार्क टँक इंडियाचे माजी जज आणि उद्योजक अशनीर ग्रोव्हर (Ashneer Grover) यांनी नाराजी जाहीर केली आहे. मला आरबीआयचं नेमकं काय सुरु आहे हे समजत नाहीये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. जगासमोर युपीआयचा डंका वाजवणं आणि भारतात दिग्गज फिनटेक कंपन्यांना शिक्षा देणं हा पूर्ण दुटप्पीपणा असल्याचं ते म्हणाले आहेत.
पेटीएम पेमेंट्स बँकेवर प्रीपेड साधनं, वॉलेट आणि फास्टटॅग सेवांसाठी नवीन ग्राहक आणि निधी स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे. आरबीआयने परिपत्रक काढत पेटीएमवर केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे. त्यानुसार, वारंवार केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षण आणि स्वतंत्र खासगी लेखापरीक्षणांच्या अहवालातून पेटीएम पेमेंट बॅंकेने आरबीआयने आखून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली केली असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
अशनीर ग्रोव्हर यांची नाराजी
केंद्रीय बँकेने मार्च 2022 मध्ये PPBL ला नवे ग्राहक जोडू नये असं सांगितलं होतं. पण तापासात पेटीएमने याचं पालन केलं नसल्याचं समोर आलं. यानंतर आरबीआयने PPBL वर निर्बंध लावले आहेत. दरम्यान फिनटेक कंपनी 'भारतपे'चे (BharatPe) माजी संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांनी एक्सवर पोस्ट लिहित आपली नाराजी जाहीर केली आहे.
फिनटेक क्षेत्र संपेल-
अशनीर ग्रोव्हर यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मला आरबीआयचं नेमकं काय सुरु आहे समजत नाही. आरबीआयने फिनटेक कंपन्यांविरोधात केलेल्या कारवाईवरुन त्यांना फिनटेक व्यवसाय नको हे स्पष्ट दिसत आहे". अशनीर ग्रोव्हर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना मध्यस्थी करण्याचं आवाहन केलं आहे.
पुढे ते म्हणाले आहेत की, "गेल्या 10 वर्षात स्टार्टअप बाजारात भांडवल आणि रोजगार देणारे सर्वात मोठे निर्माते ठरले आहेत. आज आयआयएम आणि आयआयटी नोकऱ्या देण्यासाठी संघर्ष करत आहे. एकीकडे जगासाठी युपीआयचा डंका वाजवणं आणि दुसरीकडे भारतातील दिग्गज फिनटेक्सला शिक्षा देणं हा दुटप्पीपणा आहे".
ग्राहकांवर नेमका काय परिणाम होणार?
- ग्राहक पेटीएममधून फास्टटॅग रिचार्ज करु शकत नाहीत. असंही 31 जानेवारीपर्यंत तुम्ही केवायसी अपडेट केलं नसे तर तसंही Paytm FasTAG चा वापर करु शकला नसता.
- ग्राहक ना टॉप अप करु शकतात, ना गिफ्ट कार्ड पाठवू शकतात. पेटीएम वॉलेट रिचार्जही करु शकणार नाही.
- तुम्ही युपीआय पेमेंटसाठी याचा वापर करु शकता. पण यासाठी तुमचं खातं पेटीएम बँक नव्हे तर दुसऱ्या बँक खात्यात असलं पाहिजे.
- निधी हस्तांतरणासाठी वापरले जाणारे एईपीएस, आयएमपीएस आणि युपीआय सुविधा सुरु राहतील.
- बचत बँक खाती, चालू खाती, प्रीपेड साधनं, फास्टटॅग, नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड इत्यादीतून शिल्लक रक्कम काढण्यावर किंवा वापरण्यावर निर्बंध नाहीत. ग्राहक खात्यातील उपलब्ध शिल्लक रक्कम काढू शकतात.