निम्मा देश पाण्याखाली, बळींची संख्या ७३ वर
सध्या निम्मा देश पाण्याखाली गेलेला दिसतोय. देशाच्या बहुतांशी भागात वरुणराजानं जोरदार कमबॅक केलं असून ईशान्य भारतात पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय.
गुवाहाटी : सध्या निम्मा देश पाण्याखाली गेलेला दिसतोय. देशाच्या बहुतांशी भागात वरुणराजानं जोरदार कमबॅक केलं असून ईशान्य भारतात पूराचा हाहाकार पाहायला मिळतोय.
आसाममध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झालीय. आसाममध्ये पूरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ७३ वर गेलाय. आसाममधील बहुतांशी गावात पूराचं पाणी घुसलं असून जनजीवन विस्कळीत झालंय. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य राबवलं जातंय. जवळपास १४ जिल्ह्यांमधल्या पाच लाख लोकांना याचा फटका बसलाय. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातही १० टक्के भूभाग जलमय झालाय.
आसामसोबतच ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशातही पूरानं थैमान घातलंय. या दोन्ही राज्यातही पूरामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
तिकडे दक्षिण हैदराबादमध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची दैना होतेय. सर्वसामान्यांसोबतच आंध्र प्रदेशातील सचिवालयाच्या इमारतीलाही पावसाचा फटका बसलाय.
आंध्र प्रदेशच्या अमरावती इथल्या सचिवालयातील इमारतीमध्ये पाणी गळती पाहायला मिळाली. आंध्र प्रदेशचे मनुष्यबळ विकास मंत्री गंटा श्रीनिवास राव आणि जलसंधारण मंत्री डी.उमेश्वरराव यांच्या केबिनमध्ये पावसाचं पाणी गळत असल्याचे पाहायला मिळालं. यामुळे सरकारवर टीका करण्याची आयती संधी विरोधकांना लाभली.