Shocking Video : पावसामुळं आतापासूनच हाहाकाराची सुरुवात; पूरामुळं रेल्वेही उलटली
इथं देशात मान्सूनचं आगमन होण्यास सुरुवात झालेली असतानाच तिथे भारतातीलच दुसऱ्या भागामध्ये मात्र पावसानं रौद्र रुप दाखवण्यास सुरुवात केली आहे.
नवी दिल्ली : इथं देशात मान्सूनचं आगमन होण्यास सुरुवात झालेली असतानाच तिथे भारतातीलच दुसऱ्या भागामध्ये मात्र पावसानं रौद्र रुप दाखवण्यास सुरुवात केली आहे. पूरपरिस्थितीमुळं देशातील या भागात असणारी बरीच ठिकाणं पाण्याखाली गेली आहेत.
हे ठिकाण म्हणजे आसाम. सातत्यानं सुरु असणाऱ्या पावसामुळं आसामच्या बहुतांश भागात पूराचं पाणी शिरलं आहे. भूस्खलनामुळं इथलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. (assam floods Video)
सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये असणारी जवळपास 2 लाखांहून अधिकची नागरिक संख्या पुरामुळं प्रभावित झाली आहे. (assam floods Video trains drailed stations destroyed watch )
आसाम आणि शेजारी राज्य मेघालय आणि अरुणाचल प्रदेश येथे गेल्या काही दिवसांपासून पावसाचा मारा सुरु आहे. परिणामी येथील नद्यांचा जलस्तर वाढतच चालला आहे. कोपिली नदी धोक्याच्या पातळीवर वाहताना दिसत आहे.
पूराच्या पाण्यानं रेल्वे उलटली...
आसाममधील अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे दीमा हसाओ जिल्ह्यातील हाफलोंग स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेलं आहे. या स्थानकातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जिथं रुळावर उभ्या असणाऱ्या रेल्वे गाड्याही पलटी होताना दिसत आहेत.
आसाम राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार एकट्या कछार येथे 51,357 जण प्रभावित झाले आहेत. पूराच्या पाण्यामुळं 16,645.61 हेक्टर क्षेत्रातील पिकांचंही प्रचंड नुकसान झालं आहे.
पूराच्या पाण्यात अडकलेल्यांपर्यंत मदत पोहोचलवण्यासाठी इथं यंत्रणा मेहनत घेताना दिसत आहेत. आसाममधील निसर्गाच्या रौद्र रुपाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं पाहणाऱ्यांच्या मनात पावसाबद्दल भीतीचं वातावरणही दिसत आहे.