आसाम: मुलींना काय कपडे घालावेत हा वादाचा मुद्दा आहे. मात्र आता चक्क एका 19 वर्षांच्या युवतीला तिने घातलेल्या कपड्यांमुळे प्रवेश परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतल्यानं खळबळ उडाली. 19 वर्षांच्या युवतीनं शॉर्ट्स घातल्यानं तिला परीक्षेसाठी प्रवेश नाकारला होता. धक्कादायक बाब म्हणजे तिला आपले पाय झाकण्यासाठी अखेर पडदा गुंडाळण्याची वेळ आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शॉर्ट घालून परीक्षा केंद्रावर गेलेल्या 19 वर्षांच्या युवतीला पर्यावेक्षकांनी अडवलं. तिने शॉर्ट्स घातल्याने तिला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही असं सांगण्यात आलं. तिच्या वडिलांना बाजारातून पूर्ण पायाची पॅण्ट आणायाला सांगितली. मात्र त्यांना ती जवळपास न मिळाल्याने ते रिकाम्या हातांनी पुन्हा परतले. 19 वर्षांच्या युवतीने पर्यावेक्षकांना शॉर्ट्सला परवानगी नाही असं कुठे अॅडमिटकार्डवर म्हटलं नसल्याचं सांगितलं. 


ही घटना तेजपूरच्या गिरीजानंद चौधरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट एण्ड टेक्नॉलॉजी इथे घडली. जिथे आसाम कृषी विद्यापीठाच्या (AAU) आयोजित 15 सप्टेंबर रोजी या वर्षीची कृषी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. मिळालेल्या रिपोर्टनुसार19 वर्षीय ज्युबिली तमुली तिच्या वडिलांसोबत प्रवेश परीक्षा देण्यासाठी विश्वनाथ चरियालीहून तेजपूरला आली होती.


जुबली म्हणाली की मला गेटवर कोणाही अडवलं नाही. सर्व चेकिंग झालं मात्र परीक्षा हॉलमध्ये जात असताना पर्यावेक्षकांनी अडवलं. त्यांनी शॉट्स घातले म्हणून परीक्षेला बसता येणार नाही असं सांगितलं. त्यावर मी त्यांना प्रश्न विचारला, माझ्याजवळ आवश्यकती सर्व कागदपत्र आहेत. परीक्षेला कोणते कपडे घालून यावे असं अॅडमिटकार्डवर कुठेही लिहिलेलं नाही. तर मला कसं कळणार? शॉर्ट्स घालणं हा काही गुन्हा आहे का? अनेक मुली छोटे कपडे घालतात. 


जुबली म्हणाली पर्यावेक्षकांनी माझ्या वडिलांना दुसरी पँट आणण्यासाठी पाठवलं. मात्र जवळपास न मिळाल्यानं अखेर तिला पाय झाकण्यासाठी पडदे गुंडाळायला लावले आणि मग परीक्षेला बसू दिलं. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. ही धक्कादायक घटना तेजपूर इथे घडली आहे.