Accident News : आसाममधील (Assam News) गुवाहाटीमध्ये एक हृदद्रावक रस्ते अपघात समोर आला आहे. रविवारी रात्री उशिरा गुवाहाटीतील (Guwahati) जलुकबारी भागात झालेल्या एका रस्ते अपघातात सात विद्यार्थी ठार झालेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे सात विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की गाडीचा यामध्ये चुराडा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुवाहाटीचे सह पोलीस आयुक्त ठुबे प्रतीक विजय कुमार यांनी एएनआयला सांगितले की, अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. रविवारी रात्री उशिरा गुवाहाटीच्या जलुकबारी परिसरात ही घटना घडली आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करुन या प्रकरणाचा आता तपास सुरु करण्यात आला आहे.


गुवाहाटीच्या जलुकबारी परिसरात सोमवारी पहाटे एक कार रस्त्यावरून घसरून दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाला धडकल्याने सात विद्यार्थी ठार झाले आणि काही जण जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की, जलुकबारी येथील पोलीस उपायुक्त पश्चिम कार्यालयाजवळ रविवारी रात्री एकच्या सुमारास वेगात असलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओने मालवाहू वाहनाला धडक दिल्याने हा अपघात झाला. स्कॉर्पिओमध्ये आसाम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 10 विद्यार्थी होते. स्कॉर्पिओचा चालक कौशिक बरुआ याचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून ती दुभाजकावर आदळली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू गाडीला धडकण्यापूर्वी स्कॉर्पिओ अनेक वेळा उलटली होती. विद्यार्थ्यांनी स्कॉर्पिओ गाडी भाड्याने घेतली होती आणि ती वेगात गुवाहाटी विमानतळाच्या दिशेने जात होती. तर गुवाहाटी शहरातून तीन जणांना घेऊन मालवाहू ट्रक येत होता.



स्कॉर्पिओमध्ये प्रवास करणारे सातही मृत हे विद्यार्थी होते. अरिंदम भल्लाल, राजकिरण भुयान, नियार डेका, कौशिक बरुआ, इमोन गायन, कौशिक मोहन आणि उपांशु सरमा अशी त्यांची नावे आहेत. तर स्कॉर्पिओमधील इतर तीन विद्यार्थी आणि मालवाहू वाहनाती तीन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


दुसरीकडे, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जलुकबारी रस्ता अपघातात विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्या पालकांना आणि कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना. जीएमसीएचच्या अधिकाऱ्यांशी मी बोललो आहे. जखमींना शक्य ती सर्व वैद्यकीय मदत पुरवली जात आहे, असे शर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.