काँग्रेसचा `हा` आमदार स्वत:चं तोंड काळं करणार! वेळ, तारीख, जागाही सांगितली; समोर आलं कारण
Assembly Elections 2023 Congress MLA To Blacken His Face: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघात तब्बल 29 हजारांहून अधिक मतांनी निवडणूक जिंकल्यानंतर या नवनिर्वाचित आमदाराने स्वत:चं तोंड काळ करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण असं का?
Assembly Elections 2023 Congress MLA To Blacken His Face: राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार फूल सिंह बरैया हे लवकरच स्वत:चं तोंड काळ करणार आहेत. मात्र निवडणूक जिंकल्यानंतरही हा नवनिर्वाचित आमदार असं का करणार आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यामागे एक रंजक कारण आहे. या कारणाचा खुलासा आपण पुढे पाहूच पण आपण आपलं तोंड कधी आणि कुठे काळं करणार आहे याची माहिती या आमदारानेच दिली आहे.
आमदाराचं नाव काय?
एकेकाळी बहुजन समाजवादी पार्टीचे अध्यक्ष राहिलेले फूल सिंह बरैया आता मागील बऱ्याच काळापासून काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी यंदा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढली आणि जिंकली. ते भांडेर मतदारसंघाचे आमदार झाले आहेत. भाजपाच्या लाटेमध्ये काँग्रसच्या मोजक्या उमेदवारांनी तग धरला आणि पक्षाचं नाव राखलं. अशाच उमेदवारांपैकी एक आहेत फूल सिंह बरैया! मात्र विजयानंतरही फूल सिंह बरैया आपलं तोंड काळ करणार आहेत.
तारीख, वेळ आणि ठिकाणही सांगितलं
फूल सिंह बरैया हे आपलं तोंड सार्वजनिक ठिकाणी काळं करणार आहे. काँग्रेस आमदार फूल सिंह बरैया 7 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता भोपाळमध्ये राजभवनाच्या समोर आपल्या तोंडाला काळं फासणार आहेत. आता असं करण्यामागील कारण म्हणजे फूल सिंह बरैया यांनी निवडणुकीपूर्वी एक विधान केलं होतं. भारतीय जनता पार्टीने राजस्थानमध्ये 50 हून अधिक जागा जिंकल्या तर मी माझ्या तोंडाला सर्वांसमोर काळं फासून घेईन, असं फूल सिंह बरैया म्हणाले होते. भाजपाने राजस्थानमध्ये 115 जागा जिंकल्या तर काँग्रेसने 69 जागा जिंकल्या.
...म्हणून मी लढलो
निकालानंतर बोलताना फूल सिंह बरैया यांनी आपण आपल्या विधानावर कायम आहोत असं स्पष्ट केलं. मी काही भाजपाचा नेता नाही जो दिलेला शब्दावरुन मागे फिरेल असं म्हणत लोकशाहीच्या संरक्षणासाठी रक्ताने तोंड लाल करण्याचीही आपली तयारी असल्याचं फूल सिंह बरैया म्हणाले. 'बॅलेट पेपरमध्ये 90 टक्के मतं आम्हाला मिळाली. आम्ही ईव्हीएममध्ये पराभूत झालो. भाजपाने व्होट आणि नोटची निवडणूक लढली. आम्हाला ईव्हीएमवर विश्वास नाही. आमच्या पराभवाचं मुख्य कारण ईव्हीएमच आहे,' असं फूल सिंह बरैया म्हणालेत. पुढे बोलताना, "पोटनिवडणुकीमध्ये नरोत्तम मिश्रा यांनी मला शिवी घालून निवडणूक मोहिमेला सुरुवात केली. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून मी त्यांना निवडणुकीमध्ये पराभूत करण्याचा प्रण घेतला आणि तो पूर्ण केला," असंही फूल सिंह बरैया यांनी सांगितलं.
29 हजार 438 मतांनी विजयी
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीमध्ये फूल सिंह बरैया यांनी भांडेर मतदारसंघातून 29 हजार 438 मतांनी निवडणूक जिंकली. त्यांनी भाजपाचे धनश्याम पिरौनिया यांना पराभूत केलं.