शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात काल मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पंढरपूर-हदगाव या उभ्या असलेल्या बसमधून गोळी झाडली गेली. गोळी झाडल्यानंतर बसच्या खिडकीला असलेल्या लोखंडी गजला लागून गोळी झाडणाऱ्या इसमाला लागली. मात्र लगेच गोळीबार करणारा सदर इसम पसार झाला. त्यानंतर बसस्थानकात मोठी खळबळ उडाली. काही वेळातच बस स्थानकाला छावणीचे स्वरूप आले. पुढे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता गोळीबार करणारा व्यक्ती हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. सदर इसम हा बस मधील प्रवासी होता. अहमदपूर तालुक्याच्या होकर्णा येथील बालाजी शंकरराव मुखेडे हा माजी सैनिक असल्याचे स्पष्ट झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बालाजी मुखेडेकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर असून चुकून ही गोळी झाडली गेल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे. सदर माजी सैनिकाच्या डाव्या हाताच्या करंगळीला गोळी लागल्यामुळे तो यात किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान बसमध्ये प्रवास करीत असताना बालाजी मुखेडे याने परवानाधारक रिव्हॉल्व्हर बाहेरच का काढली ? खिडकीतून त्याने कोणार रिव्हॉल्व्हरद्वारे नेम धरला होता का ? चुकुन गोळी झाडलीच गेली तर तो त्या ठिकाणाहून पसार का झाला ? या घटनेची माहिती त्याने पोलिसांना का दिली नाही ? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.



मद्यप्राशन 


माजी सैनिक बालाजी मुखेडे याने मद्यप्राशन केल्याचेही काही प्रत्यक्षदर्शी सांगत होते. याप्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात याप्रकरणी निष्काळजीपणे शस्त्रे हाताळल्या प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. बालाजी मुखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून लातूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.