नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील नाते नेहमीच खास असे राहिले आहे. अनेकदा भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांमधली जिव्हाळा दिसून येत असे. त्यामुळे या दोघांमधील किस्सेही राजकीय वर्तुळात विशेष प्रसिद्ध आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटलबिहारी वाजपेयी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मोदींच्या खांद्यावर टाकायची ठरवली तेव्हाही असाच नाट्यमय प्रसंग घडला होता. मोदींनीच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला. माझ्यावर गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी टाकायची ठरले तेव्हा अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यांनी मला अचानक फोन करुन कुठे आहेस, असे विचारले. तेव्हा मी माधवराव सिंधिया यांच्यासोबत हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेल्या वैमानिकाच्या अंत्यसंस्काच्या ठिकाणी होतो. 


'मी स्मशानात आहे', असे वाजपेयींना सांगितले. तेव्हा अटलजींना कदाचित संकोच वाटल्यामुळे 'मी आता काय बोलू', असे त्यांनी हसून म्हटले. तेव्हा मीच पुढाकार घेत, 'तुम्ही फोन केला म्हणजे नक्कीच महत्त्वाचे काम असणार', असे म्हटले. तेव्हा अटलीजींना मला 'स्मशानात का गेला आहेस आणि कधीपर्यंत परतणार', असे विचारल्याची आठवण मोदींनी सांगितली होती.