अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळले
देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळल्याचे धक्कादायक वृत्त आहे. अवघ्या २ खासदारांपासून सुरूवात करत पक्षाला केंद्रीय सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या नेत्याचे नावच मतदार यादीतून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे संस्थापक अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळल्याचे धक्कादायक वृत्त आहे. अवघ्या २ खासदारांपासून सुरूवात करत पक्षाला केंद्रीय सत्तेपर्यंत पोहोचवणाऱ्या नेत्याचे नावच मतदार यादीतून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रसारमाध्यमात आलेल्या वृत्तानुसार वाजपेयी यांचे नाव महानगरपालिका मतदार यादीतून काढण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे लखनऊ मध्ये होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या निवडणुकीत वाजपेयी यांना मतदान करता येणार नाही. गेली अनेक वर्षे वाजपेयी लखनऊला आले नाहीत. तसेच, त्यांनी गेले बराच काळ मतदानही केले नाही. त्यामुळे त्यांचे नाव मतदान यादीतून वगळण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
अटल बिहारी वाजपेयी लखनऊ येथील बनारसी दास वॉर्डातून मतदान करत असत. देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे प्रमुख नेते म्हणून अटल बिहारी यांच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असायचे. त्यांनी तब्बल १७ वर्षांपूर्वी (सन २०००) त्यांनी स्थानिक निवडणुकीत मतदान केले होते. झोनल अधिकारी अशोक कुमार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, अटल बिहारी वाजपेयी हे गेली अनेक वर्षे आपल्या पत्त्यावर राहात नाहीत. त्यामुळे मतदार याद्यांचे नूतनीकरण करताना त्यांचे नाव वगळण्यात आले.
दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घेतला. मतदार यादीत ते १०५४ क्रमांकाचे मतदार होते. तसेच, बासमंडी येथील घर क्रमांक ९२/९८-१ या पत्त्यावर ते राहात असत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेली अने वर्षे लखनऊला न येऊ शकलेले वाजपेयी सध्या लुटियंस झोन येथील ६-ए कृष्ण मेनन रोडवरील घरात राहतात.