आता नोकरी गेली तरी नो टेन्शन!, ३ महिन्यांसाठी सरकारकडून पैसे
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्यावर ९० दिवसांसाठी त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल.
नवी दिल्ली - जर तुम्ही नोकरी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. नोकरी गेल्यावर सर्वांत आधी प्रश्न मनात येतो की आता पैसे कुठून आणायचे. मग लगेचच ती व्यक्ती दुसरी नोकरी शोधू लागते. पण केंद्र सरकारने एक नवी योजना आणलीये. ज्यामध्ये नोकरी गेल्यावर कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC)अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेच्या माध्यमातून संबंधिताला आर्थिक मदत केली जाऊ शकते. जर तुमची नोकरी गेली तर तुमच्या ९० दिवसांच्या वेतनाच्या २५ टक्के रक्कम तुम्हाला मदत म्हणून या योजनेच्या माध्यमातून मिळू शकते.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्यावर ९० दिवसांसाठी त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी आधार म्हणून संबंधित कर्मचाऱ्याचे आधीच्या कंपनीतील वेतन धरले जाईल. त्याप्रमाणे त्याच्या ९० दिवसांच्या वेतनाच्या २५ टक्के रक्कम योजनेनुसार त्याला दिली जाईल.
अर्ज कसा करायचा?
अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागेल. तो अर्ज भरल्यानंतर महामंडळाच्या कोणत्याही कार्यालयात जमा करता येईल. या अर्जासोबत २० रुपयांच्या नॉन ज्युडिशियल कागदावर नोटरीकडून प्रतिज्ञापत्र करावे लागेल. ज्यामध्ये एबी१ ते ४ भरले जातील. लवकरच ऑनलाईन अर्जाची सुविधा सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी www.esic.nic.in वेबसाईटवर जावे. या योजनेचा फायदा फक्त एकाचवेळी घेता येईल.
कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यावर कोणताही गुन्हेगारी खटला असेल किंवा त्याला काही कारणांवरून कामावरून काढून टाकले असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर तसेच काही ऐच्छिक सेवानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.