म्हणून उत्तर भारतीयांचा गुजरातमधून पळ
गुजरातमध्ये उत्तर भारतीय नागरिकांच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचारामुळे अनेक नागरिकांना कामधंदा सोडून पळून जावं लागलंय.
अहमदाबाद : गुजरातमध्ये उत्तर भारतीय नागरिकांच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचारामुळे अनेक नागरिकांना कामधंदा सोडून पळून जावं लागलंय. गेल्या आठवड्यात साबरकांठा जिल्ह्यात एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर ५ जिल्ह्यांमध्ये हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचार उफाळलाय. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलंय. तसंच गेल्या ४८ तासांमध्ये राज्यात एकही हिंसाचाराची घटना घडली नसल्याचा दावा रुपानींनी केला. हिंसाचारग्रस्त जिल्ह्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून हिंदी भाषिक नागरिकांनी राज्यातून जाऊ नये, असं आवाहनही गुजरात सरकारनं केलंय.
गुजरातमध्ये नेमकं काय झालं?
गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात मागच्या आठवड्यात एका १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. यानंतर पोलिसांनी रवींद्र साहू या बिहारी व्यक्तीला अटक केली. पण या घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना लक्ष्य करण्यात येत आहे. आत्तापर्यंत गुजरातमधून हजारो उत्तर भारतीय निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.