लक्षदीप हे उजळले... 22 लाख 23 हजार दिव्यांनी उजळून निघाली रामनगरी अयोध्या
Ayodhya Deepotsav 2023 : शनिवारी अयोध्येत दीपोत्सवाचा आनंद पाहायला मिळाला. प्रभू श्रीरामाचे स्वागत करुन शरयू नदीच्या तिरावर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 22 लाख 23 हजार दिवे लावण्यात आले होते.
Ayodhya Deepotsav 2023 : दिवाळीच्या (Diwali) पूर्वसंध्येला रामनगरी अयोध्या (Ayodhya) दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली होती. अयोध्या दीपोत्सव 2023 मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath), राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह भारतातील 41 देशांच्या दूतावासातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. दिव्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी शेकडो भाविकही अयोध्या नगरीत आले होते. शरयू नदीच्या किनारी तब्बल 22 लाख 23 हजार दिवे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला आहे.
सातव्या दीपोत्सवात मुख्यमंत्री योगींच्या उपस्थितीत अयोध्येत हा नवा विक्रम रचला गेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांची नगरी असलेल्या अयोध्येत दीपोत्सव 2023 मध्ये 22.23 लाख दिवे प्रज्वलित करून नवीन विक्रम करण्यात आला. यापूर्वी 18 लाख 81 हजार दिवे लावण्याचा विक्रम होता. ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या दिव्यांच्या मोजणीनंतर दीपोत्सवाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदवला आहे.
दीपोत्सवात दिवे लागताच शरयूच्या काठावरची रामाची पेडी उजळून निघाली होती. दीपोत्सवाचा एवढा उत्साह भाविकांमध्ये दिसून आला की, देशातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक या उत्सवात सहभागी झाले होते. दीपोत्सवाच्या निमित्ताने अयोध्येतील रामकी पेडी येथील मठ आणि मंदिरांचे लाखो दिव्यांच्या प्रकाशाने आणि लेझर लाईटच्या प्रकाशाने चमकणारे दृश्य लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले.
त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदीबेन पटेल यांनी भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मण याना टिळा लावला. भगवान राम, सीता आणि लक्ष्मण हेलिकॉप्टरमध्ये आले. येथून ते रथात बसून अयोध्येकडे रवाना झाले. हा रथ मुख्यमंत्री योगी आणि राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी ओढला होता. अयोध्येतील रामकथा पार्कमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमाला पोहोचलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दीपोत्सवाचे वर्णन सांस्कृतिक चळवळ असे केले. उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि ब्रजेश पाठक यांच्यासह विविध देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत या कार्यक्रमात सहभागी झाले होते.