राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान; विलोभनीय मूर्तीचं पहिलं दर्शन भारावणारं
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : श्रीराम यांच्या मंदिर बांधणीचा ध्यास घेतल्यानंतर अखेर बांधकाम सुरु होऊन रामलल्ला मंदिरात विराजमान होण्याचा क्षणही अनेकांनी पाहिला.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्या राम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या राम मंदिरासाठी 18 जानेवारी 2024 ही तारीख आणि गुरुवारचा दिवस अद्वितीय ठरला. कारण, या दिवशी साक्षात रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात विराजमान झाली. 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी ही मूर्ती मंदिरात आणण्याक आली. या मूर्तीचा पहिला फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आणि पाहणारा प्रज्येकजण भारावला.
राम लल्लांची मूर्ती मंदिरात आणल्यानंतर मूर्तीपुढं मंत्रोच्चारांचं पठण करण्यात आलं. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मंदिरात गणेश पूजन आणि इतर देवदेवतांचं आवाहन करण्यात येणार असून 9 वाजता अरणिमंथनातून अग्नी उत्पन्न केला जाणार आहे. थोडक्यात वैदिक पद्धतीनं यज्ज्ञाच्या अग्नीची सुरुवात होणार असून, प्राण प्रतिष्ठेच्या चौथ्या दिवसाचे कार्यक्रम दिवसभर सुरु राहतील.
मंदिरात यज्ज्ञ सुरु केल्यानंतर ग्रहस्थापन, असंख्यात रुद्रपीठस्थापन, प्रधानदेवतास्थापन, राजाराम - भद्र - श्रीरामयन्त्र - बीठदेवता - अङ्गदेवता - आवरणदेवता - महापूजा, वारुणमण्डल, योगिनीमण्डलस्थापन, क्षेत्रपालमण्डलस्थापन, ग्रहहोम, स्थाप्यदेवहोम, प्रासाद वास्तुश्शान्ति, धान्याधिवास पार पडणार आहे. सायंकाळी नेहमीच्या आरतीनं या दिवसाच्या अनुष्ठानाची सांगता होणार आहे.
देवाला थंडी लागू नये म्हणून...
रक्त गोठवणाऱ्या थंडीच्या या दिवसांमध्ये रामलल्लांना थंडी लागू ने यासाठी त्यांना कमी वेळासाठी जलाधिवास केला जाणार आहे. प्रभू श्रीराम मंदिरात बालरुपात असल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या घडीला श्रीरामांची मूळ प्रतिमा कापडानं अच्छादली असून, प्राणप्रतिष्ठापनेनंतरच तिचं मूळ स्वरुप पाहता येणार आहे.
पंतप्रधान मोदींचा पूजाविधी...
राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिर परिसरात अनेक पूजाविधींना सुरुवात झाली आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा या पूजाविधीमध्ये सहभागील झाले असून, या अनुष्ठानामध्ये 121 ब्राह्मणांचाही समावेश आहे. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील या राम मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची यथासांग प्राणप्रतिष्ठा पूजा पार पडणार आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्राणप्रतिष्ठेपूर्वी खुद्द पंतप्रधानांनीही या धार्मिक विधीमध्ये सहभाग घेतसा असून, सूत्रांच्या माहितीनुसार ते फक्त नारळ पाणी ग्रहण करत असल्याचं सांगितलं जात आहे.