Sonu Nigam Over Loud Speaker Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जवळपास 5 दशकांच्या संघर्षानंतर हे मंदिर उभं राहिलं. त्यामुळेच या सोहळ्याची केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये चर्चा पाहायला मिळाली. या सोहळ्याला धर्मिक संत आणि साधूंबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमधील मान्यवर आवर्जून उपस्थित होती.


सोनू निगमला ट्रोल करण्याचा प्रयत्न...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येतील या सोहळ्याला राजकारण, क्रिडा, समाजकारण, मनोरंजन यासारख्या क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. प्रसिद्ध गायक सोनू निगमलाही या सोहळ्यासाठी निमंत्रण होतं आणि तो या सोहळ्याला आवर्जून हजर राहिला. या सोहळ्यामध्ये सोनू निगमने एक गाणही सादर केलं. मात्र या सोहळ्यानंतर काही दिवसांनी सोनूने अयोध्येत दिलेल्या या विशेष परफॉरमन्सचा व्हिडीओ शेअर करत त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न एकाने केला असताना सोनूने त्याला जशास तसं उत्तर दिलं.


सोनू निगमने अयोध्येत काय केलं?


अयोध्येतील सोहळ्याला 4 दिवसांहून अधिक कालावधी लोटल्यानंतरही या मंदिराचे, रामल्लाच्या मूर्तीचे, सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये सोनू निगमने सादर केलेल्या 'आदिपुरुष' चित्रपटातील 'राम सिया राम' गाण्याचा व्हिडीओही व्हायरल होतोय. मात्र हाच व्हिडीओ शेअर करत एका युझरने मुद्दाम सोनू निगमची कळ काढली. काही वर्षांपूर्वी सोनू निगमने मशिदींवरील भोंग्यांबद्दल आक्षेप नोंदवला होता. त्याचाच संदर्भ देत आता अयोध्येतील राम मंदिराच्या आवारात सोनू दिलेल्या परफॉरमन्सचा व्हिडीओ शेअर करत त्याला खोचक प्रश्न विचारण्यात आला. 


ट्रोलरचा प्रश्न काय होता?


राकेश राजन नावाच्या व्यक्तीने सोनू निगमचा अयोध्येतील गाण्याचा व्हिडीओ शेअर करत, "मला सोनू निगमला एक प्रश्न विचारायचा होता, तुम्हाला तर लाऊड स्पीकरच्या आवाजाचा त्रास होतो मग आज तुम्ही स्वत: लाऊड स्पीकरवर गात आहात," अशी कॅप्शन दिली. या कॅप्शनमध्ये संबंधित व्यक्तीने जस्ट आस्किंग असा हॅशटॅग वापरत सहज प्रश्न विचारला असंही म्हटलं.



सोनू निगमने काय उत्तर दिलं?


सोनू निगमनेही या पोस्टची दखल घेत त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला जशास तसं उत्तर दिलं. सोनू निगमने हा व्हिडीओ कोट करुन रिट्वीट करताना राकेश नावाच्या ट्रोलरला दमदार उत्तर दिलं. "लाऊड स्पीकरची अडचण नाही. मला अडचण कोंबड्यांप्रमाणे बांग देण्याची आहे. पहाटे 4 वाजताच्या चिल्लम-चिल्लीशी आहे," असं सोनू निगम म्हणाला. तसेच पुढे या ट्रोलरला खोचक टोला लगावताना, "बाकी तुमच्या पोटात जी काही कळ आली आहे त्याचा उपाय वैद्यकीय शास्त्रात सापडणार नाही. त्याचं उत्तर अध्यात्मिक विज्ञानात आहे," असं सोनू निगम म्हणाला.



सोनू निगमने ट्रोलरची बोलती बंद केल्याचं पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या सडेतोड उत्तराचं कौतुक केलं आहे.