Ram Mandir: अयोध्येतील मंदिरात रामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे का महत्वाचे? जाणून घ्या
Ayodhya Ram Mandir: हिंदू धर्मात मूर्तीच्या अभिषेकाला खूप महत्त्व आहे. कोणत्याही मूर्तीच्या स्थापनेसाठी प्राणप्रतिष्ठा आवश्यक असते.
Ayodhya Ram Mandir: हिंदू धर्मामध्ये आस्था ठेवणाऱ्यांसाठी नव्या वर्षाचा पहिला महिना ऐतिहासिक बनणार आहे. या महिन्याच्या 22 तारखेला अयोध्येत भव्य राम मंदिरात प्रभु रामाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. यावेळी मंदिरातील गर्भगृहात प्रभू रामाच्या बाल रुपातील प्रतिमेची प्रतिष्ठापना केली जाईल. सनातन धर्मात मंदिरातील देवाच्या मूर्तीच्या अभिषेकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण अनेक मंदिरांच्या सुरुवातील प्राण प्रतिष्ठा केल्याचे ऐकले असेल. पण असे का केले जाते? याचा विचार कधी केला आहे का? प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय? याचे महत्व काय? ती कशाप्रकारे केली जाते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
सर्वप्रथम प्राण प्रतिष्ठा म्हणजे काय? ते समजून घेऊया. हिंदू धर्मात मूर्तीच्या अभिषेकाला खूप महत्त्व आहे. कोणत्याही मूर्तीच्या स्थापनेसाठी प्राणप्रतिष्ठा आवश्यक असते. मूर्तीची प्रतिष्ठापना करणे म्हणजे ती जिवंत करण्याची पद्धत आहे. या प्रक्रियेला प्राणप्रतिष्ठा म्हणतात. प्राण म्हणजे प्राणशक्ती, तर प्रतिष्ठा म्हणजे स्थापना. देवता जीवनात आणणे किंवा प्राणशक्तीची स्थापना करणे म्हणजे प्राणप्रतिष्ठा करणे असे म्हटले जाते.
प्राणप्रतिष्ठेचे महत्त्व
हिंदू धर्मात प्राणप्रतिष्ठा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण असे केल्याशिवाय कोणतीही मूर्ती पूजेला योग्य मानली जात नाही. प्राणप्रतिष्ठेच्या पद्धतीने मूर्तीमध्ये प्राणशक्ती ओतली जाते. .यामुळे मुर्तीचे देवतेत रूपांतर होते. या पद्धतीनंतर मूर्ती पूजेस पात्र होते. त्यानंतर मूर्तीत उपस्थित देवतांची पूजा, विधी आणि मंत्रोच्चार केला जातो. श्रद्धेनुसार मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर देव स्वतः मूर्तीत उपस्थित असतो, अशी भाविकांची आस्था असते. असे असले तरी प्राणप्रतिष्ठेचा विधी योग्य तिथी आणि शुभ मुहूर्तावरच करणे आवश्यक असते. शुभ मुहूर्ताशिवाय प्राणप्रतिष्ठा केल्याने शुभ फल मिळत नसल्याचेही म्हटले जाते.
अशी होते प्राणप्रतिष्ठा
अभिषेक करण्यापूर्वी मूर्तीला गंगेच्या पाण्याने किंवा पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान घातले जाते. यानंतर मुर्ती पूर्णपणे पुसली जाते आणि तिला नवीन कपडे घातले जातात. नंतर मूर्ती स्वच्छ ठिकाणी ठेवली जाते. त्यावर चंदन लावले जाते. फुलांनी सजावट केली जाते. यानंतर बीज मंत्रांचे पठण करून प्राणप्रतिष्ठेची प्रक्रिया सुरू केली जाते. या दरम्यान देवाची विधिवत पंचोपचार करून पूजा केली जाते. शेवटी आरती केली जाते आणि लोकांना प्रसाद वाटला जातो.
प्राण प्रतिष्ठेचा मंत्र
मनो जुतिर्जुष्टमज्यस्य बृहस्पतिर्यज्ञामिमम्, तनोत्वरिष्टम् यज्ञ गम समिमम् दधातु विश्वेदेवस इह मद्यन्ता मोमप्रतिष्ठा।
असाय प्रणाह प्रतिष्ठंतु अस्य प्रनाह क्षरन्तु च असाई, देवत्व मर्चायी माम हेती च कश्चन.