Ayodhya Ram Mandir Donation Drive Fight: उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या वादामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या हाणामारीत अनेकजण जखमी झाले आहेत. 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी स्थानिक मंदिरामध्ये कार्यक्रम करण्यासाठी वर्गणी गोळा करताना हा वाद झाला. पोलिसांनी ही हाणीमारी पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन झाल्याचं सांगितलं आहे. मात्र मरण पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना हा सांप्रदायिक विषयावरुन झालेला वाद असल्याचा दावा केला आहे.


नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मरण पावलेल्या तरुणाचं नाव विनोद कश्यप असं आहे. विनोद त्याचा भाऊ आणि इतर काही लोकांसोबत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करत होता. वर्ग गोळा करताना 'जय श्री राम'च्या घोषणाही दिल्या जात होत्या. त्याचवेळी कथित दाव्याप्रमाणे दुसऱ्या समुदायाच्या लोकांनी या वर्गणी गोळा करणाऱ्यांवर हल्ला केल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'ने दिलं आहे. उन्नावचे पोलीस निरिक्षक सिद्धार्थ शंकर मीणा यांनी 'इंडिया टुडे'ला दिलेलया माहितीनुसार, ही घटना 14 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता घडली. "हे लोक वर्गणी मागत असताना त्या ठिकाणी दाखल झालेल्या टोळक्यातील काले खान नावाच्या व्यक्तीने वर्गणी मागणाऱ्यांकडून पैशांची मागणी केली. त्यांनी वर्गणी गोळा करणाऱ्यांवर दगड फेकले. या हल्ल्यात 2 जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी विनोद नावाच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला," असं मीणा यांनी सांगितलं.


मृताच्या भावाचा आणि पत्नीचा वेगवेगळा दावा


विनोदच्या भावाने केलेल्या दाव्यानुसार, वर्गणी गोळा करताना 'जय श्री राम'च्या घोषणा दिल्याने काले खान आणि त्याचे सहकारी संतापले. मात्र दुसरीकडे मरण पावलेल्या विनोदच्या पत्नीने वेगळेच आरोप केले आहेत. प्रीतिने केलेल्या दाव्यानुसार, काले खान आणि त्याचे सहकारी आधी विनोदच्या भावाला घेऊन गेले. मात्र विनोद त्याला वाचवण्यासाठी गेला असता त्याच्यावर दगड विटांनी हल्ला करण्यात आला. प्रीतिने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. या तक्रारीनुसार काले खानबरोबरच त्याचे सहकारी छोटू खान, सुहैल आणि जमशेद यांना अटक करण्यात आली आहे.


गर्दी अन् तणाव


विनोदचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी परसल्यानंतर गंगाघाट पूलावर शेकडोच्या संख्येनं लोकांची गर्दी झाली. उन्नाव-कानपूर मार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली. अधिकाऱ्यांनी बराच वेळ समजून घातल्यानंतर जमाव शांत झाला आणि रस्ता पुन्हा सुरु करुन देण्यात आला. दोन समाजांमधील प्रकरण असल्याने पोलीस अधिक काळजी घेत आहेत. अनेकजण याला सांप्रदायिक प्रकरण म्हणून पाहत असून चर्चा करत आहेत. मात्र हे तसं प्रकरण नसून दोन गटांमध्ये पैशांच्या व्यवहारांवरुन झालेला हा वाद असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.