Ram Mandir Ayodhya: अयोध्येतील राम मंदिराबाबत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. 1 जुलैपासून राम मंदिरात अनेक नवीन व्यवस्था लागू करण्यात आल्या आहेत. मंदिरातील पुजाऱ्यांवरही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर, आता रामलल्लाच्या पुजाऱ्यांसाठी खास ड्रेसकोड ठेवण्यात आला आहे. आता हा ड्रेसकोड असेल तर मंदिरात प्रवेश मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 जुलैपासून राम मंदिरात पुजाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. रामलल्लाच्या पूजाअर्चेसाठी 26 पुजारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सेवा देणार आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने स्थापित केलेल्या धार्मिक समितीने 21 नवीन प्रशिक्षित पुजाऱ्यांना पूजन पद्धतीत सामिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ट्रस्टने पुजाऱ्यांसाठी ओळखपत्रदेखील जारी केले आहे. लवकरच 6 महिन्यांपर्यंत प्रशिक्षण प्रमाणपत्राबरोबरच नियुक्ती पत्रदेखील या पुजाऱ्यांना सोपवण्यात येणार आहे. 


रामललाचे सहाय्यक पुजारी अशोक उपाध्याय यांनी म्हटलं आहे की, ट्रस्टने राम मंदिरात येणाऱ्या पुजाऱ्यांना अँड्रोइंड फोन गाभाऱ्यात आणण्यास बंदी घातली आहे. कोणत्याही प्रकारचे स्मार्टफोन मंदिरात आणता येणार नाहीयेत. फक्त कीपॅड असलेला फोन मंदिरात आणता येणार आहे. पुजाऱ्यांसाठी एक विशेष ड्रेस कोडदेखील देण्यात येणार आहे. यात सदरा (चौबंदी), धोतर आणि पगडी असणार आहे. मात्र, ट्रस्टकडून अद्याप कोणतेही तसे आदेश आले नसल्याचे पुजाऱ्यांचे म्हणणे आहेत. त्याबरोबर मंदिर परिसरात असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांसाठीदेखील राम मंदिर ड्रेस कोड लागू करणार आहे.


राम मंदिर प्रशिक्षणाच्या आधी 11 प्रशिक्षार्थियांना रामलल्लाच्या पूजन पद्धतीत सहभागी करुन घेतले होते. रामनवमीच्या दरम्यान रामलल्लाची पूजा अर्चनासाठी 11 पुजाऱ्यांना सहभागी करुन घेतलं होतं. ज्यात दररोज सकाळी रामलल्लाची मंगला आरती, श्रृगांर आरती आणि शयन आरती ते रामरक्षा स्त्रोत्र आणि पुरुस्त्रोत्रच्या 16 मंत्रांचे उच्चारण केले जाते.


रामलल्लाला 56 पदार्थांचा विशेष भोग 


आषाढी कृष्ण एकादशीच्या निमित्ताने सोमवारी रामलल्लाला विशेष श्रृंगारसोबतच संपूर्ण मंदिर परिसरात फुलांनी सजवले होते. त्यानंतर रामलल्लाची विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर दुपारी 56 प्रकारच्या व्यंजनांचा भोग चढवण्यात आला. त्यानंतर भाविकांना हा प्रसाद वाटण्यात आला. रामलल्ला्च्या दरबारात या उत्सवाचे आयोजन कर्नाटकचे जगद्गुरु स्वामी सुकेन्दाचार्य यांच्या भक्तांकडून करण्यात आले.