Ram Mandir: अयोध्येत (Ayodhya) साकारत असलेलं भव्य राम मंदिर (Ram Mandir) जनतेसाठी कधी खुलं होणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. आता राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा (Nripendra Mishra) यांनी याबाबत मोठी माहिती दिली आहे. 15 जानेवारी ते 24 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलं जाईल. प्राण प्रतिष्ठापणेनंतर राम मंदिर भाविकांसाठी खुलं केलं जाणार आहे. 24-25 जानेवारी 2024 पासून भाविक रामलल्लाचं दर्शन करु शकणार आहेत. देशभरासह परदेशातही हा कार्यक्रम लाईव्ह पाहण्याचं नियोजन करण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम मंदिराच्या गाभाऱ्याच्या मुख्यद्वारावर सोन्याचं कोरीव काम करण्यात आलं आहे. याशिवाय मंदिराचा 161 फूट उंच असलेला कळसही सोन्याने आच्छादित असेल अशी माहिती नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे. राम मंदिराचं काम कधी पूर्ण होणार याबाबत अनेकवेळा चुकीची माहिती पसरवण्यात आली. या बातम्यांचं रामजन्मभूमी ट्रस्टने खंडन केलं आहे. राम मंदिराचं बांधकाम तीन टप्प्यात केलं जात आहे. पहिल्या टप्प्यात पांच मंडपांचं काम पूर्ण होईल. यात सर्वात महत्त्वाचं असेल तो मंदिराचा मुख्य गाभारा. या ठिकाणी रामलल्लाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणा केली जाणार आहे.  राम मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. 


कसं आहे राममंदिर?


अयोध्येतल्या भव्य राम मंदिराचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. राजस्थानमधल्या गुलाबी दगडापासून राम मंदिराचं गर्भगृह बनवलं जात आहे. मंदिराच्या तळमजल्यावर गर्भगृह, नृत्य मंडप, रंगमंडप असणार आहे. तर उत्तर आणि दक्षिण दिशेला कीर्तन मंडप असणार आहे. जानेवारी 2024 च्या तिसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बाल भगवान रामाच्या मूर्तीची मूळ जागी प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही अयोध्येत प्रभू श्रीरामाची पूजा करण्यासाठी जाणार आहेत.


मंदिरासाठी महाराष्ट्रातील सागवानी लाकूड


राममंदिराच्या गर्भगृहासाठी मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडाचा वापर केला जात आहे. यासाठी महाराष्ट्रातील आलापल्लीच्या जंगलातील सागवान लाकडाची निवड करण्यात आली. महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वनविकास महामंडळाला हे सागवान पुरवण्यासाठी श्रीराममंदिर ट्रस्टने विनंती केली. यानंतर आलापल्लीच्या जंगलातील उत्कृष्ट सागवान राममंदिरासाठी निवडण्यात आलं. यासाठी चंद्रपुरातून सागवान लाकडाची पहिली फेरी रवाना झाली.