अयोध्या : श्रीराम मंदिराचा आग्रह धरत अयोध्येला रामजन्मभूमी परिसरात जमलेल्या शिवसेना नेत्यांना आज वेगळाच अनुभव आला. इथल्या लक्ष्मण किल्ल्यातल्या मठात या नेत्यांना लक्ष्मणाचा प्रसाद मिळाला, मात्र पंगतीत आणि तेही पत्रावळीत. पंगतीत भारतीय बैठक असल्यानं शिवसेनेच्या नेत्यांना जमिनीवर मांडी घालून जेवावं लागलं. तांदळाची खीर, आलू-पनीरची भाजी, पुऱ्या आणि भात असा साधा बेत इथं होता. शिवसेनेचे संसदीय गटनेते संजय राऊत, महाराष्ट्राचे सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांनी मांडीला मांडी लावत पंगतीत महाप्रसाद घेतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अयोध्येत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आगमनाआधीच शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, राज्याचे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आज शरयूच्या किनाऱ्यावर पोहचले. लक्ष्मण किला परिसरात शिवसेनेनं सभास्थळाचं भूमीपूजन केलं. यावेळी महंत मैथिली शरणसह आणखी काही संत सामील झाले.



येत्या २४ तारखेला उद्धव ठाकरे संतांचा सत्कार करणार असून २५ नोव्हेंबरला जनसंवादाचा कार्यक्रम आखण्यात आलाय. तर संध्याकाळी शरयूच्या किनाऱ्यावर  आरती करण्यात आली. राममंदिराचं भूमीपूजन करता येत नसल्यामुळे शिवसेनेनं अयोध्येत जाऊन सभास्थळाचं भूमीपूजन करून घेतल्याची चर्चा रंगू लागलीय. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला कुठल्याही परवानगीची गरज नसल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. झी २४ तासचे कार्यकारी संपादक प्रसाद काथे यांनी राऊत यांच्याशी खास बातचीत केली.