नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील गाझिपूरसह तीन जिल्ह्यांच्या मशिदींमध्ये अजानच्या बंदीसंदर्भात दाखल करण्यात याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. अलाहाबाद हायकोर्टाने गाझिपूर, हाथरस आणि फर्रुखाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करत, मशिदींमध्ये तोंडी अजानसाठी परवानगी दिली आहे, परंतु लाऊडस्पीकरवरुन अजानसाठी परवानगी देण्यात आलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायमूर्ती शशिकांत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजित कुमार यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयात असं सांगण्यात आलं की, अजान लाऊडस्पीकर किंवा इतर कोणत्याही उपकरणांशिवाय मानवी आवाजात मशिदींमधून पठण करु शकतात. लाऊडस्पीकरद्वारे अजान देणं हा इस्लामचा भाग नाही.  लाऊडस्पीकर नव्हते त्यावेळीही अजान होत होती. लाऊडस्पीकरवरील बंदी योग्य असून हे धार्मिक स्वातंत्र्याचं उल्लंघन नाही. अजान धार्मिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित असून या अधिकाराचं उल्लंघन करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.



कोणत्याही परिस्थितीत जिल्हा प्रशासन सकाळी 10 ते सकाळी 6 या वेळेत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी देऊ शकत नाही. त्याशिवाय, मशिदीत लाऊडस्पीकरद्वारे अजान वाचण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक असेल. प्रशासनाच्या परवानगीशिवाय लाऊडस्पीकरद्वारे अजान वाचणं बेकायदेशीर ठरेल असं न्यायालयाने सांगितलं आहे.


गाझिपूर मतदारसंघाचे खासदार अफझल अन्सारी यांनी लाऊडस्पीकरद्वारे अजान देण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या आदेशाचं पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.