`कानाखाली दिली असती तर...`, बजरंगचं बृजभूषण यांना जोरदार प्रत्युत्तर, `मेडल न आल्याने जे खूश झाले, त्यांची देशभक्ती...`
Bajrang Punia On Brij Bhushan Singh : भाजप नेते बृजभूषण सिंह यांनी केलेल्या आरोपाला आता बजरंग पुनियाने शड्डू ठोकून उत्तर दिलंय.
Haryana Election : भारताची प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी कुस्तीच्या आखाड्यातून आता राजकारणाच्या आखाड्या पाऊल टाकलं आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांनी शड्डू ठोकला असल्याने आता भाजपचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय. अशातच आता भाजपकडून बृजभूषण सिंह यांनी मोर्चा सांभाळला असून त्यांनी विनेश फोगाटवर गंभीर आरोप केले होते. त्यावर आथा बजरंग पुनियाने जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
ब्रिजभूषण सिंह यांनी फोगटच्या अपात्रतेवर आनंदी असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून ब्रिजभूषण सिंह यांना बजरंग पुनिया यांनी जोरदार उत्तर दिलंय. ब्रिजभूषण शरण सिंह यांची देशाप्रती असलेली मानसिकता समोर आली आहे. हुकलेलं पदक हे विनेशचे पदक नव्हतं. ते पदक संपूर्ण 140 कोटी भारतीयांचं पदक होतं. जे विनेशच्या अपात्रतेचा आनंद साजरा करतात, ते देशभक्त आहेत का? असा सवाल बजरंग पुनियाने विचारला आहे. आम्ही लहानपणापासून देशासाठी लढतोय, ते आम्हाला देशभक्ती शिकवणार का? आता तुमची देशाप्रती असलेली मानसिकता समोर आली आहे. जर मुलींमध्ये कानाखाली मारायची हिंमत असली तर तुम्हाला खूप मार बसला असता, असं म्हणत बजरंगने जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून बाहेर पडली तेव्हा आमच्या कठीण काळात काँग्रेस आमच्या पाठीशी उभी राहिली. इतर आप आणि इतर पक्षही आमच्यासोबत होते. त्यानंतर आम्ही काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. आता पंतप्रधान मोदींकडून आम्हाला कोणत्याही आशा नाहीत. माझ्याविरुद्ध एजन्सींचा वापर करण्यात आला. डोपिंगचा आरोप करत माझ्यावर बंदी घालण्यात आली होती, असंही बजरंगने यावेळी म्हटलं.
बृजभूषण सिंह यांनी विनेशवर काँग्रेस प्रवेशानंतर आरोप केले. मी चूकीचा असतो तर मला कानाखाली मारायला हवी होती. पण विनेशने चूक केली, तिने दुसऱ्या खेळाडूच्या हक्क हिसकावून घेतला. ट्राय़लमध्ये दुसऱ्या पोरीने तिला हरवलं होतं, पण तिने राडा केला अन् पात्रता मिळवली. विनेशसोबत जे झालं, ती त्यासाठीच पात्र होती, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याआधी विनेश फोगाटने सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. शुक्रवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत विनेश फोगाटने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. विनेश फोगाट भारतीय रेल्वेत (Indian Railway) कामाला होती. रेल्वेत ती ओएसडी स्पोर्ट्स या पदावर होती.