नवी दिल्ली: बालाकोट एअर स्ट्राईकचे पुरावे देण्यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता या एअर स्ट्राईकबद्दल नवीन माहिती पुढे आली आहे. बालाकोट हल्ल्याच्यावेळी वापरण्यात आलेल्या प्रत्येक विमानात ७० ते ८० किलो स्फोटके होती. यावरुन जैश-ए-मोहम्मदच्या तळाची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचा अंदाज बांधला जात आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत बालाकोट हल्ल्याबद्दल कोणतीही माहिती द्यायला नकार दिला होता. मात्र, काही व्यावसायिक उपग्रहांकडून जारी करण्यात आलेल्या छायाचित्रांवरून या हल्ल्यात झालेल्या नुकसानीचा अंदाज येऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही लढाऊ विमानात बुलेटस आणि केसिंग वगळून आवरण नसलेली स्फोटके असतात. प्रत्येक विमानात हे प्रमाण वेगवेगळ असू शकते. मात्र, बालाकोट हल्ल्याच्यावेळी भारताकडून वापरण्यात आलेल्या प्रत्येक विमानात जवळपास ७० ते ८० किलो स्फोटके होती, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली. 


बालाकोट हल्ल्यासाठी भारताने इस्रायली बनावटीच्या स्पाईस २००० या लेझर गाईडेड बॉम्बचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. भारताने या हल्ल्यादरम्यान जवळपास १००० किलो स्फोटके दहशतवादी तळावर डागल्याचा अंदाज होता.


मात्र, केवळ स्फोटकांच्या प्रमाणावरून हल्ल्यात किती हानी झाली, हे निश्चित होत नाही. ही स्फोटके कशाप्रकारे आणि कोणत्या कोनातून आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे साहित्य वापरले जाते, यावर अनेक गोष्टी अवलंबून असल्याचेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.