नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा झाली आहे. केंद्र सरकारनं या तीन बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतरचं बँकिंग क्षेत्रातलं हे दुसरं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या तिन्ही बँकांच्या विलीनीकरणानंतर तयार होणारी बँक देशातली तिसरी सगळ्यात मोठी बँक असेल, अशी प्रतिक्रिया वित्त सेवा सचिव राजीव कुमार यांनी दिली आहे. सरकारनं बजेटमध्ये बँकांचं एकीकरण केलं जाईल, अशी घोषणा केली होती. हा आमचा अजेंडा आहे आणि त्यासाठी आम्ही हे पाऊल टाकलं आहे, असं अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले.


कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तिन्ही बँकांच्या विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांनी चिंतित व्हायचं कारण नाही. कर्मचाऱ्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल. विलीनीकरणानंतर ही भारतातली तिसरी सगळ्यात मोठी बँक बनेल, असं ट्विट अरुण जेटलींनी केलं.


एसबीआयच्या सहयोगी बँकांचं आधीच विलीनीकरण


स्टेट बँकेच्या पाच सहयोगी बँकांचं याआधीच विलीनीकरण करण्यात आलं होतं. स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ जयपूर अँड बिकानेर या स्टेट बँकेच्या सहयोगी बँकांचं स्टेट बँकेत विलीनीकरण झालं होतं.