मुंबई : तुम्ही देवाचे किती भक्त आहात? अमर भारतीसारखे तर नक्कीच नसाल. अमर भारती हे एक बॅंकर होते आणि त्यानंतर ते संन्यासी झाले. नुकताच त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अमर भारती एका परदेशी व्यक्तीशी त्याच्या विश्वासाबद्दल आणि एका दशकापेक्षा जास्त काळ हात न ठेवण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना दिसत आहेत. योगी भारती जवळपास 5 दशकांपासून हात वर केल्यामुळे चर्चेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगी भारती यांनी हा टोकाचा निर्णय घेण्यामागे असलेल्या प्रेरणेविषयी सांगितले आहे. ते म्हणतात की हे त्यांनी भगवान शिवाचा सन्मान करण्यासाठी केलं आहे. व्हायरल होत असलेला हा थ्रोबॅक व्हिडीओमध्ये भारती हे तरुण असल्याचे दिसत आहे.  यावेळी योगी भारती हे तंबूत बसलेल्या एका परदेशी व्यक्तीशी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाषेच्या अडथळ्यांना न जुमानता दोघे संवाद साधतात. 


एका जिज्ञासू अशा परदेशी व्यक्तीनं भारती यांना हात वर करण्याच्या सुरुवातीच्या प्रेरणेबद्दल विचारले. तेव्हा ते म्हणाले की, त्यांना जगासाठी काम करायचं आहे आणि त्यासोबत त्यांच्या स्वामींचा आदर करायचा आहे. ते किती दिवस हे व्रत करणार याविषयी बोलताना भारती यांनी खुलासा केला की, याविषयी त्यांनी कोणताही विचार केलेला नाही, परंतु त्यांचे संपूर्ण आयुष्य असेच राहील.



अमर भारती यांनी आयुष्यभर हात वर करून ठेवला आहे, त्यांनी जवळपास 50 वर्षानंतरही हात खाली केला नाही. ते पुढे म्हणाले की झोपतानाही ते हात वर ठेवतात. भारती पुढे म्हणाले, आता त्यांचा हात दुखत नाही, त्यांनी आपल्या हाताच्या संवेदना आणि शक्ती पूर्णपणे गमावली आहे. भारती रूढिवादी जीवन जगत होते. त्याच्याकडे कुटुंब, नोकरी होती, परंतु जेव्हा त्यांनी संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा परिस्थिती बदलली. संन्याशाप्रमाणे जीवन जगण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. 1973 मध्ये भारती यांनी आपलं घर सोडून साधूचं जीवन स्वीकारण्याचा निर्णय घेतला. घरातून बाहेर पडताच भारती यांनी हात वर केला.