Aadhaar Linking: आधार कार्ड चुकीचं लिंक झाल्याने बीडी कामगार झाला लखपती; मात्र 2 वर्षांनी थेट तुरुंगात झाली रवानगी
Banking Mistake Put Man In Jail: हा सारा प्रकार तब्बल 2 वर्ष सुरु होता. 2022 साली या प्रकरणाचा खुलासा झाला आणि सत्य समोर आलं. संबंधित व्यक्तीला हा प्रकार समोर आल्यानंतरही 6 महिन्यांनी अटक केली आहे.
Banking Mistake Put Man In Jail: देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़ के अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे. मात्र अनेकदा अशाप्रकारे छप्पर फाड कमाई कोणत्या माध्यमातून होते आणि अचानक धनलाभ झाला तर तो कसा झाला आहे हे ही महत्त्वाचं असतं. असा अचानक झालेला धनलाभ अनेकदा व्यक्तीला गोत्यातही आणू शकतो. असाच काहीसा प्रकार झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात घडला. येथील जीतराय सामंत नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यासंदर्भात झालेल्या गोंधळाची शिक्षा जीतरायला भोगावी लागली. जीतरायला थेट तुरुंगाची हवा खावी लागली आहे. जीतरायने एका महिलेच्या खात्यातून पैसे काढल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र खरं तर या व्यक्तीने थेट कोणाचीही फसवणूक केलेली नाही.
तो 2 वर्षांपासून काढत होता पैसे
झालं असं की, 42 वर्षीय जीतराय बीडी कामगार आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांनी घातलेल्या गोंधळामुळे जीतरायचा आधार कार्ड क्रमांक एका अन्य महिलेच्या बँक खात्याशी जोडला गेला. जीतराय हा कॉमन सर्व्हिस सेंटरवरुन गरज पडेल त्याप्रमाणे पैसे काढत होता. मागील 2 वर्षांमध्ये कोरोना काळात जीतरायने महिलेच्या खात्यावरुन 1 लाख रुपयांचा निधी काढून आवश्यकतेनुसार खर्च केला. या प्रकरणामध्ये खात्यावरुन पैसे खर्च झाल्याचं महिलेच्या लक्षात आल्यानंतर तीने पोलिसांकडे तक्रार केली असता जीतरायला अटक करण्यात आली. मुळात यामध्ये जीतरायची काही तांत्रिक चूक नसून मुळ चूक बँकेच्या कर्मचाऱ्यांची आहे. जीतरायचा आधार कार्ड क्रमांक बँकेने या तक्रारदार महिलेच्या खात्याशी जोडला. त्यामुळे जीतरायला या खात्यावर पैसे जमा झाल्याचं 2 वर्षांपूर्वीच समजलं. त्यानंतर जीतराय हा बँक खात्यामधील पैसे काढण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये गेला होता. येथे एका बँक कर्मचाऱ्यानेच त्याला आधार क्रमांकाच्या मदतीने पैसे कसे काढता येतील हे प्रात्यक्षिकासहीत दाखवलं. त्यानंतर जीतरायने अनेकदा या आधार क्रमांकाशी संलग्न खात्यावरुन पैसे काढले.
चौकशीचे आदेश
विशेष म्हणजे तब्बल 2 वर्ष हा सारा प्रकार सुरु होता. सप्टेंबर 2022 मध्ये लागुरी नावाच्या महिलेने या बँकेच्या मॅनेजरकडे खात्यावरुन पैसे गायब असल्याची तक्रार केली. झारखंड राज्यातील ग्रामी बँक प्रबंधकांकडेही तिने लेखी तक्रार केली. मागील काही काळापासून सातत्याने खात्यावरुन थोडे थोडे करुन पैसे कमी होत असल्याचं या महिलेने सांगितलं. त्यानंतर संबंधित प्रबंधकांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.
2 वर्षांनी FIR दाखल
तपासामध्ये बँक कर्मचाऱ्यांनी जीतराय सामंतचं आधार कार्ड या महिलेच्या खात्याशी जोडल्याचं समोर आलं. त्यामुळेच हा गोंधळ घडला. बँकेने जीतरायला खर्च केलेले पैसे महिलेला परत करावेत असं सांगितलं. मात्र बीडी कामगार असलेल्या जीतरायकडे या महिलेला परत करायला पैसेच नव्हते. त्यामुळेच पोलिसांनी कलम 406 आणि 420 अंतर्गत जीतरायविरोधात ऑक्टोबर महिन्यात एफआयआर दाखल केला. 5 दिवसांपूर्वी म्हणजेच 24 मार्च रोजी जीतरायला अटक करण्यात आली.
खात्यात होते केवळ 650 रुपये
या प्रकरणामध्ये बँकेची चुकी आहेच मात्र जीतरायचीही मोठी चूक यात आहे. पोलिसांनी बँकेच्या माध्यमातून कालावधी देत जीतरायला पैसे परत करण्याची नोटीस दिल्याचं सांगितलं. मात्र जीतरायला पैसे परत करता न आल्याने त्याला अटक करण्यात आली. नैतिक जबाबदारी म्हणून जीतरायने पैसे परत करायला हवे होते. जीतरायच्या खात्यावर 650 रुपये असतानाही तो 500 ते 5000 रुपयांपर्यंत पैसे खात्यावरुन वरचेवर काढायचा. म्हणजेच कल्पना असूनही जीतरायने पैसे वापरले असं सांगितलं जात आहे.