१ डिसेंबरपासून बदलतोय बॅंकींगचा `हा` नियम, आताच जाणून घ्या
१ डिसेंबर २०२० पासून कॅश ट्रान्सफर संदर्भातील काही नियम बदलणार आहेत.
नवी दिल्ली : या वर्षी खूप काही बदलत चाललंय. यातून बॅंकींग सेक्टर (Banking Sector) देखील सुटले नाहीय. रिझर्व बॅंक ऑफ इंडीया (RBI) ने रियल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) मधील नियमांमध्ये बदल केलाय. ज्यामुळे १ डिसेंबर २०२० पासून कॅश ट्रान्सफर संदर्भातील काही नियम बदलणार आहेत. यामध्ये सर्वात मोठा बदल RTGS संदर्भातील आहे.
नव्या नियमांनुसार आता २४ तास RTGS सुविधेचा फायदा घेता येणार आहे. RBI हा नियम १ डिसेंबरपासून लागू करेल. सध्या आरटीजीएस सिस्टीम महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार व्यतिरिक्त आठवड्यातील कामकाजाच्या दिनी सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ पर्यंत उपलब्ध होती. पण आता सातही दिवस या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मोठे व्यवहार, मोठे फंड ट्रान्सफर करणे हे डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलाय.
एका बॅंकेतून दुसऱ्या बॅंकेत पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये RTGS, NEFT आणि IMPS सर्वात प्रसिद्ध आहेत. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये NEFT देखील २४ तास सुरु केली होती. आरबीआयच्या गाईडलाईननुसार आरटीजीएस सर्व्हीस सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ पर्यंत मिळते.
भारतीय वित्तीय बाजाराच्या जागतिक एकत्रीकरणाचे उद्दीष्ट, भारतात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रे विकसित करण्याचा प्रयत्न आणि देशीय कॉर्पोरेट्स आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात देय लवचिकता प्रदान करण्यासाठी चालू असलेल्या कार्यास पाठिंबा देण्याच्या हेतून हा निर्णय घेण्यात आलाय.